-
जत,का. प्रतिनिधी: हलका पाऊस झाला तरीही त्यामुळे मान टाकणाऱ्या रस्त्यांमुळे जतकर हैराण झाले आहेत. रस्ते असे लगेचच खराब होण्याचे कारण त्यात होणारा भ्रष्टाचारच असल्याची टीका त्यामुळे होत आहे. निकृष्ट दर्जाचा माल वापरण्यामुळे रस्त्यांचा दर्जा ढासळला असून,गावा गावातील अतर्गंत सिमेंटचे नव्याने होणारे रस्तेही आता याच मार्गाने जाऊ लागले असल्याचे दिसते आहे.भष्ट्र साखळीने कोणतीही सुधारणा होण्याची नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जवळपास सर्वच ठेकेदार राजकीय पुढारी किंवा संबधित असल्याने मनमानेल तशी कामे करत आहेत. त्यात विभागाचे उपअंभियेही सामिल आहेत. त्यामुळे तक्रारी होऊनही चांगला रस्त होत नाही,हे विशेष..
काही वर्षांपूर्वी जतेतील रस्त्यांचे त्यांच्या गुणवत्तेविषयी बाहेरगावी नाव घेतले जायचे. दर्जेदार रस्ते आजही अनेक भागात दिसतात.गेल्या काही वर्षांत मात्र ही स्थिती बदलली आहे. ठेकेदार व अधिकारी यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून रस्ते शास्त्रीय पद्धतीने तयार करणे तर थांबलेच आहे, पण आता त्यासाठीचे डांबर, खडी हे साहित्यही निकृष्ट वापरले जाऊ लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हलका पाऊस झाला तरीही रस्त्यावर खड्डे पडतात व नंतरच्या पावसात ते फाटतच जातात.डांबरीकरणाच्या 500 मीटर अंतराच्या कामाला साधारण 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च येतो. मोठे रस्ते 40 एमएमचे तर लहान रस्ते साधारण 25 ते 30 एमएमचे केले जातात. गेल्या काही वर्षांत फक्त रस्त्यांच्या कामांवर म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. रस्ते तयार करण्याची पूर्वीपासूनची शास्त्रीय पद्धत आहे. 40 एमएमचा रस्ता असेल तर तो करण्यापूर्वी किमान 1 इंच तरी खोदून घ्यावा लागतो. त्यानंतर त्यावर खडीच्या व विशिष्ट प्रकारच्या डांबराचे दोन थर द्यावे लागतात. प्रत्यक्ष रस्त्यावर पुन्हा बारीक खडी व डांबर ओतावे लागले. असे केले तर तो रस्ता किमान 2-5 वर्षे तरी खराब होत नाही. खोदाई व त्यावरचे दोन थर रस्त्याला खड्डे पडण्यापासून वाचवत असतात.कामाच्या निविदेत स्पष्ट उल्लेख असलेल्या या तरतुदी अनेक ठेकेदार प्रत्यक्ष काम करताना गुंडाळून ठेवतात असे दिसते आहे. खोदाई व तो दोन विशिष्ट थर न देताच आहे त्या रस्त्यावर खडी व डांबर ओतून रस्ते तयार केले जात आहेत. 40 एमएमचा रस्ता प्रत्यक्षात 30 किंवा 25 एमएमचाच केला जात आहे. त्याची तपासणी होत नाही. झाली तरी त्यात सर्व काही बरोबर असल्याचेच दाखवले जाते. ठेकेदाराचे बिल त्वरित अदा केले जाते. काम झाल्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीची गॅरंटी म्हणून ठेकेदाराची अनामत रक्कम काही वर्षे ठेवून घेतली जाते, पण कामात मोठा फायदा झाल्यामुळे ठेकेदाराला काहीही फरक पडत नाही.
कोट्यवधींचा खर्च… तरीही रस्ते खराबच
गतवर्षी रस्ते कामासाठी मोठा निधी आला आहे. त्यापूर्वीही असेच काही कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सदस्यांच्या यादीतून होणारा गल्लीबोळातील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा व काँक्रिटीकरणाचा खर्च वेगळाच! असा कोट्यवधींचा खर्च होऊनही रस्ते सातत्याने खराब होतच असतात.
केबल कंपन्यांची खोदाई कारणीभूत
केबल कंपन्यांच्या खोदाईमुळेही रस्त्यांची वाट लागली आहे. त्यांच्याकडून बांधकाम विभाग,नगरपरिषद, ग्रामपंचायती रस्तेदुरुस्तीचे वेगळे पैसे वसूल करते. खोदलेला रस्ता दुरुस्त करण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे, त्यानुसार खड्डा आणखी मोठा करून त्यात डांबरी, खडी टाकणे गरजेचे असते, मात्र ते न करता माती व दगड टाकून त्यावर थेट डांबरीकरण अथवा सिमेंटचे अस्तर लावले जाते.यंत्राने वेळ वाचतो मात्र दर्जाची वाट,डांबर व खडी यांचे त्यांच्या दर्जानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. खडी किती व डांबर किती याचेही शास्त्रीय प्रमाण असते. डांबराच्या चिकटपणावर त्याचा दर्जा अवलंबून असतो. व्हीजी 10 पासून ते व्हीजी 60 पर्यंत डांबराचे अनेक प्रकार आहेत. कमी चिकटपणा असलेले डांबर स्वस्त मिळते. निविदेत ठेकेदाराने कोणते डांबर वापरावे याचा उल्लेख असतो, मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. डांबर कमी व खडी जास्त असे झाले की रस्त्याला पक्केपणा येत नाही. त्यावर पाणी पडले तर डांबर उखडून निघते व खडी दिसू लागते. बारीक खडी, पावडर महाग असल्याने त्याचा आवश्यक प्रमाणात वापर केला जात नाही. डांबर, खडी मिक्स करून ती थेट रस्त्यावर अंथरून शिवाय त्यावर रोलर फिरवणाऱ्या यंत्राने आता डांबरीकरण केले जाते. या यंत्राने वेळ वाचत असला तरी दर्जाची मात्र वाट लागते.पूर्वी रस्ता तयार करताना त्याला मध्यभागापासून दोन्ही बाजूंना हलकासा उतार असायचा. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहत नसे. तो ओघळून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या पन्हाळातून वाहून थेट गटारीमध्ये जात असे. ही व्यवस्थाच गेल्या काही वर्षांत रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी मोडून टाकली आहे. रस्ता न खोदताच डांबरी केला जातो. त्याला उतार दिला जात नाही. पन्हाळी शिल्लकच ठेवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहते. डांबर निकृष्ट असल्याने पाण्याशी संपर्क येताच ते खराब होते. खडी वर येतात व नंतर रस्ता तिथून फाटतच जातो. हे दुष्टचक्र सातत्याने सुरू आहे.रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रकतयार करणे, निविदा मागवणे, ठेकेदार नियुक्त करणे, त्याच्या कामावर लक्ष ठेवणे, ते खराब होत असेल तर नोटीस काढणे, दंड करणे, काम दर्जेदार करून घेणे ही सर्व जबाबदारी बांंधंकाम विभागाची आहे.तालुक्यातील रस्त्यांची हलक्या पावसानंतरही होणारी अवस्था पाहिल्यावर ते काय करतात हे लक्षात येते.



