द्राक्षबागा धोक्यात
द्राक्षबागायतदार हादरले;’डाऊनी’ प्रादुर्भाव वाढला
![]()
जत,(प्रतिनिधी);जतसह सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज,कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्षबागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला असून बागायतदार हादरले आहेत. कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला आहे.ऊन-पावसाचा खेळ आणि ढगाळ वातावरण यामुळे या रोगाचा प्रसार वाढू लागला आहे.
बदलेल्या वातावरणामुळे द्राक्षबागायतदारांची झोप उडाली आहे.डाऊनीमुळे एकरी खर्चात वाढ झाली आहे.तर काहींनी बागा सोडून दिल्या आहेत.कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग आणि शिंदेवाडी येथील शेतकऱ्यांनी बागा सोडल्या आहेत.डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये,म्हणून जिल्ह्यातल्या फळ छाटण्या संपूर्ण थांबल्या आहेत. डाऊनी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फवारणीची संख्या वाढवली आहे.मात्र तरीही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात आगाप द्राक्ष फळ छाटनी केलेल्या बागांवर डाऊनी रोगाने घाला घातला आहे.
पलूस तालुक्यात द्राक्ष पोंगा अवस्थेत असताना पावसाने सुरुवात केली.यामुळे द्राक्षांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली.गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने वातावरण बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.यामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे.
काही द्राक्ष उत्पादकांनी नवीन बागांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून कलम करण्याचे काम हाती घेतले आहे.परंतु,या पावसामुळे या बागेवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बाधित झालेल्या काड्या काढून टाकल्या आहेत.पुन्हा नवीन कलम करण्याचे काम हाती घेतले असले तरी त्यावरही रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.नवीन बागांमध्ये कलम करण्याचे काम जतसह जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांनी थांबविले आहे.



