मुलांची दृष्टी जपायची, तर स्मार्ट फोन देणे बंद करा

0

मुलांची दृष्टी जपायची, तर  स्मार्ट फोन देणे बंद करा

बदलत्या काळात तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत असतानाही त्यातून शिकण्याचे किंवा बोध घेण्याचे नाव घेतले जात नाही. लहान मुलांबाबतही असेच होत आहे. खेळण्यांची जागा स्मार्ट फोनने घेतल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि त्याचे पालकांना विशेष कौतुक असले तरी मुलांवर दूरगामी विपरीत परिणाम होऊ शकतात, असे निष्कर्ष काढले जात आहेत. या परिणामांत लहान वयातच दृष्टिदोषाची समस्या वाढताना दिसते. लहान मुलांची दृष्टी जपायची असेल, तर खेळणे म्हणून स्मार्ट फोन देणे बंद करावे लागेल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. 

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या महाजालात अधिकच गुरफटून घेणाऱ्यांची संख्या सर्वत्रच वाढत आहे. मात्र, त्याचे परिणाम काय आहेत, याचा कुणीच विचार करायला तयार नाही. तरुणाईपर्यंत मर्यादित असलेले हे तंत्रज्ञान आता लेकरांच्या पाळण्यापर्यंत पोचले आहे. त्यामुळे “असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ या म्हणीचा विसर पडत असल्याचे दिसत आहे.  लहान मुलगा असो की तरुण, जर दहा फुटांच्या आत टीव्ही पाहत असतील तर त्याचा परिणाम होणारच. विशेष म्हणजे मोबाईलच्या बाबतीतदेखील असेच आहे. परंतु इतक्‍या लांबून आपण मोबाईल वापरू शकत नाही. मात्र, स्मार्टफोनचा अतिवापर तरुणाईलादेखील धोकादायक ठरू शकतो, त्याचा लहान मुलांवर काय परिणाम होत असेल, याचा आपण विचारच करीत नाही. लहानपणीच जर सारखे जवळचेच पाहण्याची सवय लागली तर दूरचे तितकेसे स्वच्छ दिसत नाही, त्यामुळे आपली नजर जवळच अडकून जाते. त्याचा परिणाम भविष्यात तीव्र होऊ शकतो. 

विशेष म्हणजे सारखे घरात राहून मोबाईलवर विविध गेम खेळणाऱ्या मुलांना शारीरिक हालचाली होत नसल्याने भूक लागत नाही, त्यामुळे त्यांच्या शारीरिक वाढीवर मोठा विपरीत परिणाम दिसून येतो. मोबाईलवर मुलांना मानसिक समाधान मिळत असले तरी त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे, या बाबींचा आई-वडिलांनी विचार करायला हवा. 

टीव्ही, मोबाईल किंवा संगणक स्क्रीन सतत नजरेसमोर राहिल्यास लहान मुलांच्या डोळ्यांचे स्नायू तणावाखाली राहतात. पूर्वी दोन इंच स्क्रीन असलेले मोबाईत होते, त्या वेळी साधारणतः दिवसभरातून तासभर मोबाईलवर जात असे, आता दहा इंची मोबाईल आल्याने साहजिकच त्यावर खेळण्याचे प्रमाण सहा तासांवर गेले आहे. त्यापासूनचे रेडिएशन दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहे. त्याचा गंभीर परिणाम लहान मुलांच्या डोळ्यांवर होत आहे. याबाबत पालकांनीच सावधानता बाळगण्याची गरज आहे.

      मुलांचा तात्कालिक आनंद शोधण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा विकास करण्यासाठी आई-वडिलांनी काळजी घ्यावी. घरात पाहुणे आले, की मुलांनी लुडबूड करू नये, म्हणून सर्रास बहुतांश घरांत मुलांच्या हाती लागलीच मोबाईल दिला जातो, हे घातक आहे. आमचा मुलगा खूप छान मोबाईल हाताळतो, हे अभिमानाने सांगण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे मुलांना कुठले खेळ, खाणे-पिणे आवश्‍यक आहे, याचा विचार करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. कोवळ्या वयातच त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. 

हे आहे वास्तव 

– स्मार्ट फोननी घेतली खेळण्यांची जागा 

– दृष्टिदोषासह शारीरिक विकासही खुंटतोय 

– लहान मुलांत दृष्टिदोषाचे 60 ते 80 टक्के प्रमाण 

– “असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ लक्षात घ्यायला हवे 

टीव्ही, संगणक, स्मार्ट फोनचे परिणाम 

Rate Card

– एकाग्रता, सहनशक्ती कमी होणे 

– शारीरिक क्षमतांवर विपरीत परिणाम 

– स्वमग्नतेत वाढीचा धोका 

– सूक्ष्म काम करण्यात प्रचंड अडथळे 

– शारीरिक, मानसिक समन्वय साधण्यात अडचणी 

अशी घ्यावी काळजी 

– शक्‍यतो लहान मुलांना स्मार्ट फोन देऊच नयेत 

– स्मार्ट फोन दिल्यास वापराची वेळ ठरवून द्यावी 

– मुलांना टीव्ही जवळून पाहू देऊ नये 

– प्रतिसेकंद दहा-दहा हालचाली आहेत, असे कार्टून शो पाहू नयेत 

– दिवसभरातून अधिकाधिक 35 मिनिटे संथ गतीचे कार्यक्रम पाहू द्यावेत 

– संगणक हाताळतानाही वेळेची मर्यादा ठेवावी

-मच्छिंद्र ऐनापुरे,जत 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.