जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात येणाऱ्या शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यत येथील गरीब,अज्ञान नागरिकांना लाचगिरीसाठी नागविण्याचे प्रकार नवे नाहीत, तालुक्यात सर्वाधिक महसूल विभाग लाच स्विकारण्यात आघाडीवर आहे.गावागावात नेमलेले तलाठी व सर्कल यांच्याकडून जमिन,प्लॉट नोंदीसाठी २० हजार ते १ लाखापर्यत दर लावण्यात आले आहेत.पैसे न देणाऱ्या अनेक नोंदी किरकोळ त्रूटी काढून गेल्या कित्येक वर्षापासून तलाठी,सर्कल यांच्याकडे प्रंलबित आहेत.जत महसूलला बदलविण्याचा ठेका घेऊन आलेले नवे तहसीलदार बनसोडे हे नोंदीसाठी लाचेचा नवा ट्रेड रोकणार का?पुढेही असेच नागरिकांना ओरबडण्याचे सुरू राहणार याकडे तालुका वासियाचे लक्ष लागले आहे.
जत तालुका टेबल खालून पैसे मिळविण्याचे मृगजळ ठरला आहे.येथे येणारा शिपाईही लाखो रूपये कमवू शकतो तेथे वरिष्ठ अधिकारी, सर्कल,तलाठ्याचा हिशोब करता येत नाही.इतकी कमाई महसूलमध्ये केली जात आहे.सध्या तालुक्यात नोंदीला पैसे घेण्याचा नवा ट्रेड तत्कालीन प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी सर्कल व तलाठ्याच्या माध्यमातून रुजविला आहेत.विशेष म्हणजे शहरी भागात नोंदीला गुंठ्याला वीस हजाराचा दर आहे तर ग्रामीण भागात एकर जमिनीची नोंद करण्यासाठी ३० हजाराचा दर लावण्यात आला आहे.पैसे दिल्याशिवाय एकही नोंद केली जात नसल्याचे अनेक वेळा सिध्द झाले आहे.त्याशिवाय यासाठी आंदोलन,उपोषणेही करण्यात आली आहेत.मात्र आतापर्यत एकाही अधिकाऱ्यांनी नोंदीच्या दरांचा ट्रेड बदलविलेला नाही.आता नवे अधिकारी हा ट्रेड बदलवणार असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे.
तलाठ्याच्या बदलीसाठी दर
जत तालुक्यातील महसूल विभागातील लुट हे नवे नाही,त्यात अधिकारी गुंतलेले असल्याने दर बंद करण्याचे धाडस कोणही दाखवत नाही.तालुक्यात तलाठ्याची शहरी भागात बदली करण्यासाठी पाच लाख तर ग्रामीण भागातील वाळू तस्करी,महसूली उत्पन्न जोरात असलेल्या गावात एक लाख रूपयाचा दर असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ अधिकारी मिळकतीनुसार अशा पध्दतीने बदली करतात,हे अनेक वेळा स्पष्ट झाले आहे.
नोंदीसाठी दलालाची नेमणूक
तालुक्यातील जत शहरासह तालुक्यात प्रत्येक तलाठ्याकडे अशा नोंदीचे काम आणण्यासाठी दलाल नेमण्यात आले आहेत. थेट येणाऱ्या नागरिकांचे अनेक त्रुटी काढून नोंदी रखडविल्या जातात.तेच काम दलालाकडून आल्यानंतर पटकन करून दिले जात आहे.
थेट तलाठी नोंदीचा दर सांगतात
जत शहरासह तालुक्यात अनेक तलाठी नोंदीला दस्त घेऊन येणाऱ्या नागरिकांना नोंदीचे थेट दर सांगतात.दर नाही ठरविला तर नोंदी अनेक वर्षे पेंडिग ठेवल्या जात आहेत.
तहसीलदारांच्या नावाचा वापर
एका नोंदीसाठी एवढे पैसे कशासाठी द्यायचे म्हणून विचारले तर तहसीलदार, प्रांत यांना पैसे द्यावे लागतात,असे थेट तलाठी,सर्कल सांगतात.त्यामुळे हतबल नागरिक दलालकडून,किंवा थेट पैसे देऊन नोंदी करून घेतात.यावर कोणही
ब्र शंब्द काढत नाही हे विशेष..
सर्वच मालामाल
जत तालुक्यात नोंदीच्या ट्रेडमध्ये लोक सेवेचा आव आणणारे राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,वरिष्ठ अधिकारी,माध्यम प्रतिनिधी यांचे हात ओले होत असल्याने सर्वच सहभागाने मालामाल होत आहेत.तेथे गरीब शेतकरी, नागरिकांचा विचार कोन करणार असाही प्रश्न आहे.
चौकट
टेबल पुराण : एक कर्मचारी अजूनही टेबलला चिटकूनच
जत तहसील कार्यालयातील टेबल पुराण अजून संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. यापुर्वीच्या दोन तहसीलदारांना धाकात घेऊन एक महिला कर्मचारी मालदार टेबलवर अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत.त्याचा टेबल बदललेला आदेश सोशल मिडियावर व्हायरल होऊनही अद्याप त्यांना टेबल सोडवत नसल्याचे वास्तव आहे. तर जतचा महसूल विभाग बदलण्याची भूमिका असणारे नवे तहसीलदार यात हतबल झालेत का?,वरून कुणाचा त्यांच्यावर दबाव आहे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.