पत्रकारितेचा गौरव
दोन पत्रकारांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळणं स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे. आज जगात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संकटाचे ढग जरा अधिकच घिरट्या घालत असताना पत्रकारांचा सन्मान हा खरोखरच पत्रकारितेचा सन्मान आहे. फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रासा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांना 2021 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारितेचे हे यश असून ज्याचा माध्यमांच्या एकूण गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होईल,असे म्हणायला हरकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांसाठी मारिया रुसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना सन्मानित केले गेल्याने जगातील लोकशाही आणि जगातील चिरस्थायी शांततेला बळकटी येईल.
मारिया रासा या आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर सत्तेचा गैरवापर, हिंसाचाराचा वापर आणि फिलीपिन्समधील वाढती हुकूमशाही यावर प्रकाश टाकण्यासाठी करत आहेत. त्यांनी 2012 मध्ये शोध पत्रकारितेसाठी एका डिजिटल मीडिया कंपनीची स्थापना केली आणि त्यांच्या देशातील वादग्रस्त ड्रग्सच्या विरोधात लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात यश आले. जगाने रासाच्या बनावट बातम्यांच्या विरोधात एकूण केलेल्या कामगिरीकडे लक्ष दिले पाहिजे, यामुळे माध्यमांची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे, रशियन पत्रकार दिमित्री आंद्रेयविच मुराटोव्ह या ‘नोवाजा गझेटा’ हे वृत्तपत्र चालवतात. नोबेल समितीच्या मते, आज रशियातील सर्वात स्वतंत्र वृत्तपत्र आहे. मुराटोव्हने त्यांच्या देशातील झपाट्याने बदलणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे काम केले आहे.
त्यांचे रशियन वृत्तपत्र तिथे प्रभावीपाने पत्रकारिता करत आहे, भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, निवडणुकीतील फसवणूक आणि ट्रोल मोहिमांवर आवाज उठवत आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘नोवाजा गझेटा’च्या पत्रकारांना अनेक प्रकारे छळाला सामोरे जावे लागले आहे. तसेच धमक्या आणि हिंसाचारालाही तोंड द्यावे लागले आहे. या वृत्तपत्राने त्यांचे सहा पत्रकारही गमावले आहेत. यात अन्ना पोलितकोवस्काजा यांचाही समावेश आहे.त्यांनी आपल्या लेखणीने चेचन्यामधील युद्धाला वाचा फोडली. खूप दबाव असूनही वृत्तपत्राचे मुख्य संपादक मुराटोव्ह यांनी वृत्तपत्राचे स्वतंत्र धोरण सोडण्यास नकार दिला असल्याचे नोबेल समितीने जगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
आज जेव्हा जग अपूर्ण माहिती आणि बनावट बातम्यांनी व्यापलेले असताना पत्रकारितेची खरी बेटे ओळखणे फार महत्वाचे आहे. चांगली पत्रकारिता कोणत्याही शांततेच्या प्रयत्नांपेक्षा कमी नाही. आज जे पत्रकारितेचा वापर द्वेष आणि जातीयवाद वाढवण्यासाठी करत आहेत त्यांच्यासाठी तर या नोबेल पुरस्कारांमध्ये एक विशेष संदेश दडलेला आहे. चांगल्या जगासाठी प्रामाणिक पत्रकारिता आवश्यक आहे. आज चांगल्या पत्रकारितेला अधोरेखित करणे आणि त्याचा सन्मान करणे खरोखरच आवश्यक आहे. हे नोबेल पारितोषिक जगातील त्या सर्व पत्रकारांना बळ देईल जे खरे आणि न्याय्य पत्रकारितेसाठी समर्पित आहेत. नोबेल समितीने योग्यच म्हटले आहे की, स्वतंत्र आणि तथ्यावर आधारित असलेली पत्रकारिता सत्तेचा गैरवापर, खोटे बोलणाऱयांच्या विरोधात आणि युद्धापासून संरक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे आज सामान्य लोकांनीही खऱ्या पत्रकारितेच्या बाजूने उभे राहण्याची गरज आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली