जत : दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांची होणारी दुर्दशा म्हणजे राज्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेचे धिंडवडेच म्हणावे लागतील. जे राज्यकर्ते नेहमी पायाभूत सुविधांच्या नावाने दवंडी पिटतात आणि या पायाभूत सुविधांसाठी देशभरात लाखो कोटी रुपये खर्च होतात. त्यात रस्ता या सुविधेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. निदान जे महत्वाचे राज्य महामार्ग आहेत ते तरी खड्डेमुक्त असले पाहिजेत.कारण राज्याचा ते आरसा असतात.
वाहनांना खड्ड्यांचाच सामना करावा लागतो. नितीन गडकरी यांच्या भाषणात सातत्याने कुठल्या ना कुठल्या नव्या रस्त्यांची घोषणा असते. ते लाख आणि कोटीच्या भाषेतच भाषण करतात. परंतु नव्या रस्त्यांचा हा डांगोरा पिटत असताना जुन्या रस्त्यांचे काय धिंडवडे निघतात याकडे ते सविस्तर दुर्लक्ष करतात.दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढते आहे. पण रस्ते तंत्रज्ञानामध्ये केंद्र आणि राज्य शासन अपेक्षेप्रमाणे काम करताना दिसत नाही. गडकरी यांचे खाते उत्तम काम करीत असल्याचे मान्य करुन देखील प्रत्येक राज्यातले मध्यमस्वरुपाचे रस्ते हा सध्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरतो. कारण सामान्य माणसाला रोज याच छोट्या मध्यम रस्त्यांवरुन जावे लागते.
तालुका किंवा जिल्ह्याला जाण्यासाठी हे रस्ते जर नीट नसतील तर गडकरी यांनी कितीही मोठ्या घोषणा केल्या तरी त्याला अर्थ उरत नाही. विशेष म्हणजे ते ज्या मोठमोठ्या रस्त्यांची माहिती देत असतात. ते रस्तेसुद्धा कालांतराने खराब होतात.जत शहरातील व तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याबाबत कोणीच आवाज उठवताना दिसत नाही.वर्तमानपत्रात वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर लाजेखातर थातुरमातुर खडीचा मुलामा पसरून मोकळे होतात.
काही दिवसांनी पुन्हा जैसे ते परिस्थिती असते.खड्ड्याचे सोयरसुतक कोणालाही पडलेले नाही. तसेच जे काही येण्या जाण्याचे रस्ते आहेत. त्या रस्त्यावर सर्वत्र खड्डयांचे साम्राज्य असल्याचे चित्र पहावयास मिळते. मात्र राज्यकर्ते व्यसपीठावरून लंबीचौडी भाषणबाजी करताना रस्त्यांचा उल्लेख कसे सुंदर बनविले असल्याचे सांगत सुटतात.मात्र या रस्त्यांची अवस्था ते दररोज या रस्त्यावरून येजा करीत असूनही त्यांना दिसत नाही. याचाच अर्थ रस्त्यांवर खड्डे पडू दे अथवा काहीही आम्हांला आमचे, रस्त्यांचे काम करणारे ठेकेदार व ठेका मंजूर करणारे अधिकारी वर्ग याचा विकास झाला म्हणजेच जनतेचा विकास झाला असेल असे समजावे लागेल.
आजच्या घडीला जत शहर परिसरात अपघात झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डेच कारणीभूत ठरले आहेत. रस्त्यांचे काम नव्याने केल्यानंतर त्याची डागडुजी करण्याचे काम ठेकेदाराचे असतानाही किती ठेकेदारांनी डागडुजी केली का? पुन्हा डागडुजीच्या नावाखाली ठेका काढला आहे. अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांच्या नावाखाली अनेकजण मालामाल झाले आहेत. तरीही रस्त्यांवरील खड्डयांचे साम्राज्य कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. मग याला जबाबदार कोण याचाही खुलासा व्यासपीठावर लंबीचौडी भाषणबाजी करताना का उल्लेख करीत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही रस्त्याबद्दल समाधान व्यक्त करावे, अशी आजपरिस्थिती राहिलेली नाही. प्रगतीचे आणि विकासाचे गोडवे गाऊन काही होणार नाही. त्याकरिता तितक्याच कणखरपणे धोरणे राबवावी लागतील. आता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता विकास कामांना राजकीय पक्ष व त्यांचे नेते सुरुवात करुन मतदारांची दिशाभूल करतील. तरी मतदारांनी याचा विचार करुनच मतदान करावे.
जत-सांगलीला जोडणाऱ्या राज्य महामार्गावर खड्डे कुठे नाहीत,हे शोधण्याची वेळ आली आहे.विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्याने जत शहरात पडलेला जीवघेणा खड्डा