जत : दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांची होणारी दुर्दशा म्हणजे राज्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेचे धिंडवडेच म्हणावे लागतील. जे राज्यकर्ते नेहमी पायाभूत सुविधांच्या नावाने दवंडी पिटतात आणि या पायाभूत सुविधांसाठी देशभरात लाखो कोटी रुपये खर्च होतात. त्यात रस्ता या सुविधेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. निदान जे महत्वाचे राज्य महामार्ग आहेत ते तरी खड्डेमुक्त असले पाहिजेत.कारण राज्याचा ते आरसा असतात.
आजच्या घडीला जत शहर परिसरात अपघात झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डेच कारणीभूत ठरले आहेत. रस्त्यांचे काम नव्याने केल्यानंतर त्याची डागडुजी करण्याचे काम ठेकेदाराचे असतानाही किती ठेकेदारांनी डागडुजी केली का? पुन्हा डागडुजीच्या नावाखाली ठेका काढला आहे. अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांच्या नावाखाली अनेकजण मालामाल झाले आहेत. तरीही रस्त्यांवरील खड्डयांचे साम्राज्य कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. मग याला जबाबदार कोण याचाही खुलासा व्यासपीठावर लंबीचौडी भाषणबाजी करताना का उल्लेख करीत नाहीत.

थोडक्यात सांगायचे तर कोणत्याही रस्त्याबद्दल समाधान व्यक्त करावे, अशी आजपरिस्थिती राहिलेली नाही. प्रगतीचे आणि विकासाचे गोडवे गाऊन काही होणार नाही. त्याकरिता तितक्याच कणखरपणे धोरणे राबवावी लागतील. आता नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे आता विकास कामांना राजकीय पक्ष व त्यांचे नेते सुरुवात करुन मतदारांची दिशाभूल करतील. तरी मतदारांनी याचा विचार करुनच मतदान करावे.
जत-सांगलीला जोडणाऱ्या राज्य महामार्गावर खड्डे कुठे नाहीत,हे शोधण्याची वेळ आली आहे.विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्याने जत शहरात पडलेला जीवघेणा खड्डा