तासगावात पोलिसांचा दुजाभाव : सामान्य लोकानांही गेटवर अडवले
तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून काल रोहित पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्ज दाखल करतानाचे फोटो घेण्यास निवडणूक आयोगाने पत्रकारांना मज्जाव केला. अर्ज दाखल करतानाचा फोटो निवडणूक आयोग देईल, असे सांगण्यात आले होते. एकीकडे पत्रकारांना अर्ज दाखल करतानाचे फोटो घेण्यास मज्जाव केला असताना दुसरीकडे रोहित पाटील यांच्यासोबत त्यांचे सोशल मीडियाचे काम पाहणाऱ्याला मात्र पोलिसांनी गेटच्या आत घेतले. तर आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या सामान्य लोकांनाही पोलिसांनी गेटवर अडवले होते. पोलिसांच्या या दुजाभावाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून काल रोहित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत केवळ पाचच व्यक्ती तहसील कार्यालयाच्या गेटच्या आत सोडण्याचे फर्मान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोडले होते. त्यामुळे पोलिसांनीही गेटवर उमेदवारासोबत केवळ पाच व्यक्ती सोडण्याची भूमिका घेतली.
तसेच जे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरतात त्यांचे फोटो आम्ही पत्रकारांना देऊ, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र रात्रीचे आठ – नऊ वाजले तरी प्रशासनाकडून हे फोटो तसेच कोणी – कोणी अर्ज भरले, याबाबतची अधिकृत माहिती पत्रकारांना दिली जात नाही.
दरम्यान, उमेदवारांचे अर्ज भरतानाचे फोटो पत्रकारांना घेण्यास मज्जाव करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांचा दुजाभाव चव्हाट्यावर आला आहे. काल रोहित पाटील यांचा अर्ज भरताना त्यांच्यासोबत तहसील कार्यालयाच्या गेटवरून त्यांचा सोशल मीडियाचा एक व्यक्तीही पोलिसांनी आत सोडला. जर पोलिसांना उमेदवारासोबत सोशल मीडियाचा व्यक्ती चालतो तर मग पत्रकारांनी फोटो घेतलेले का चालत नाही, असा सवाल तासगावच्या पत्रकारांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय काल रोहित पाटील ज्यावेळी अर्ज भरायला आले होते, त्यावेळी तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणचे पोलीस कोणालाही आत सोडत नव्हते. अनेक सामान्य लोक गेटवर आले होते. त्यांची तहसील कार्यालयात कामे रखडली होती.
मात्र पोलिसांनी रोहित पाटील अर्ज भरणार आहेत, त्यामुळे कोणालाही आत सोडू नका, अशा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत, असे सांगत सामान्य लोकांनाही गेटवर अडवले. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त होत आहे.