तासगाव : तासगाव तालुक्यातील नागाव (क) येथील नूतन पाटील हिने एमपीएससी परीक्षेतून उपजिल्हाधिकारी ही पोस्ट मिळवली. तिच्या या यशाबद्दल पत्रकार अमोल पाटील,विनायक कदम, पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, योगेश वाघमोडे, सुहास यादव, उमेश माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून नूतन पाटील यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आई, वडील, भाऊ असा तिचा छोटासा परिवार आहे. इंजिनिअरिंग करीत असताना तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. घरची अत्यंत बेताची परिस्थिती असतानाही त्यावर मात करीत नूतन पाटील हिने जोमाने अभ्यास केला. आपल्या गरिबीचा बाऊ न करता तिने एकचित्ताने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पहिल्यांदा एक – दोन वेळेस अपयश आल्यानंतर खचून न जाता तिने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला.
अखेर ‘एमपीएससी’तील सर्वात मोठी उपजिल्हाधिकारी ही पोस्ट तिने मिळवली.नुकतीच तिची या पोस्टसाठी निवड झाली आहे. थोड्याच दिवसात तिच्या प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे. गावातून क्लास वन पोस्ट मिळवणारी नूतन पाटील ही एकमेव व्यक्ती आहे. तिच्या या यशाबद्दल आज तिचा सत्कार करण्यात आला. तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




