टी २० चा रणसंग्राम

0
आजपासून (२३ ऑक्टोबर ) आखातातील दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे टी २० क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. आज  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका तसेच इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यात सामने होणार आहे. वास्तविक टी २० विश्वचषकाची प्राथमिक फेरी १७ ऑक्टोबर पासूनच सुरू झाली असून प्राथमिक फेरीतून प्रत्येक गटातून दोन असे चार संघ आणि टी २० क्रमवारीत पहिल्या आठ क्रमांकावर असलेले आठ संघ अशा एकूण १२ संघात ही स्पर्धा रंगणार आहे.

 

ही ७ वि टी २० विश्वचषक स्पर्धा असून याआधी झालेल्या सहा स्पर्धेत वेस्ट इंडिजने दोनदा तर भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेली पहिली टी २० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला नमवत तो  विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्यांनतर भारताला पुन्हा ती करामत करता आली नाही.

 

 

 

 

यावेळी तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ही करामत करून देशवासीयांना दिवाळीची भेट देतील अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे. अर्थात यावेळेचा भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.  सलग आठ टी २० मालिकेत अजिंक्य राहण्याचा विक्रम भारताच्या नावे आहे. भारताचे सर्वच खेळाडू आयपीएल खेळून आले आहेत  त्यामुळे खेळाडूंना पुरेशी मॅच प्रॅक्टिस मिळाली आहे.  आयपीएल खेळून आल्याने या खेळाडूंमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे.

 

 

 

आयपीएल देखील याच मैदानांवर झाली असल्याने तेथील खेळपट्टी आणि हवामानाशी भारतीय खेळाडू परिचित आहेत. भारताचे सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहे.  सलामीवर रोहित शर्मा,  के एल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव, ईशान किशन हे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारताची फलंदाजी  भारताचे बलस्थान आहे. जडेजा, अश्विन, वरून चक्रवर्ती हे फिरकी गोलंदाज जगातील कोणत्याही फलंदाजीस खिंडार पाडू शकतात तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार ही वेगवान चौकडी  देखील घातक गोलंदाजी करत आहेत.  अष्टपैलू हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली तर तो भारतासाठी तो मोठा बोनस ठरेल.

 

 

 

सराव सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला सहज नमवत इतर संघांना इशारा दिला आहे. भारताचा पहिला सामना उद्या २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणे हा सामना रंगतदार ठरणार यात शंका नाही. पाकिस्तानने याआधी कोणत्याही विश्वचषकात भारताला पराभूत केले नाही. यावेळीही भारत अजिंक्यच राहील अशी खात्री क्रिकेट रसिकांना आहे. भारताचा दुसरा सामना न्यूझीलंडशी आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल. कारण त्यानंतर  अफगाणिस्तान व पात्रता फेरीतून आलेल्या दोन संघांशी भारताचे सामने होतील. गटात अव्वल स्थानी पोहचण्याचे भारताचे लक्ष असेल.

 

 

 

भारत विश्वविजेतेपदासाठी फेव्हरेट असला तरी वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ देखील विजेतेपदाचे दावेदार आहेत. त्यांच्याकडेही दर्जेदार खेळाडू आहेत म्हणूनच ही टी २० विश्वचषक स्पर्धा रंगतदार ठरणार आहे. सर्वच संघ विजेतेपदासाठी जीवाचे रान करणार आहे. भारतीय संघातील खेळाडू देखील जीवाचे रान करून ही टी २० विश्वचषक स्पर्धा जिंकून देशवासीयांना दिवाळीची भेट देतील यात शंका नाही.भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा!

 

 

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.