जत : रामदास जगताप यांच्यावर कारवाई व्हावी,या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जत तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.यामुळे तलाठी विभागातील सात-बारा उतारे, फेरफार, बोजा नोंदीचे काम, विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले, ई पीक पाहणी ही सर्व कामे बंद आहेत.तलाठ्याच्या संपामुळे चावडीचे कामकाज बंद झाले आहे.
तहसील कार्यालयातील अनेक महत्वाची कामे यामुळे ठप्प झाली आहेत.परिणामी शेतकरी,नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
राज्याचे समन्वय, ई- महाभूमी प्रकल्प अधिकारी रामदास जगताप यांनी सोशल मीडिया ग्रुपवर तलाठी व मंडळ अधिकारी यांना उद्देशून अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ दि.१२ ऑक्टोंबर पासून काम बंद आंदोलन सुरू आहे.
जोपर्यंत जगताप यांची बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा पवित्रा तलाठी संघटनेने घेतल्याने शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. तहसीलदार यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपूर्वीच डिजिटल सिग्नेचर प्रणाली तलाठी व मंडळाधिकारी यांनी जमा केले आहे. यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत.
राज्यात तलाठी आणि मंडळधिकारी आंदोलनावर आहेत.
आंदोलनाचा भाग म्हणून मंगळवार (दि. १२) पासून तलाठ्यांनी त्यांच्याकडील डिजिटल सिग्नेचर प्रणाली तहसिल कार्यालयात जमा करुन कामावर बहिष्कार घातला आहे.राज्यातील गावगाड्याचे कामकाज ठप्प झाले आहे. आंदोलनात राज्याचे जमाबंदी आयुक्तालयातील समन्वयक रामदास जगताप यांना निलंबित करावे, अशी तलाठी संघाची मागणी आहे.