महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी

0
जत तालुक्याला प्राचीन आणि ऐतिहासिक इतिहास आहे. रामायण आणि महाभारत याचबरोबर शिलाहार, कलचुरी, देवगिरीचे यादव, मोगल, विजापूरची आदिलशाही आणि शिवशाही अशा सर्व राजवटींच्या काळात जत तालुक्याला महत्त्व होते. सांगली जिल्ह्याच्या एका पूर्व टोकाला असलेल्या आणि आकाराने विस्तीर्ण असलेल्या जत तालुक्यात प्राचीन काळापासून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. तालुक्याचे ठिकाण असलेले जत शहर(जयंत नगरी), संख, उमदी, उमराणी(प्राचीनकाळी उंबरवनी), माडग्याळ (प्राचीन नांव माडगीहाळ), सिंगनहळ्ळी, लोणार,डफळापूर ही व अन्य अनेक गांवे प्राचीन आहेत. सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या इतिहासात पराक्रमाचा ठसा उमटविणारे देवगिरीचे राजे सिंघनदेव आणि संकमदेव यादव या तालुक्यात येऊन गेलेले आहेत.त्यांच्या नांवाने ओळखली जाणारी सिंघनहळ्ळी व संख अशी गांवे आजही या तालुक्यात आहेत.

 

 

 

 

विशेष म्हणजे सिंघनहळ्ळी या लोणारीबहूल गावात लोणारी समाजाची लोकसंख्या 90 टक्केच्या आसपास आहे.तर संख व परिसरातील गोंधळेवाडी, सोरडी, आसंगी, जाल्याळ, दरिबडची, माणिकनाळ, खंदनाळ या गावात लोणारी समाजाची लोकसंख्या दखलपात्र आहे.तर सिंघनहळ्ळी या ऐतिहासिक गावाच्या शेजारी लोणारवाडी (वाळेखिंडी), काशिलिंगवाडी, बागलवाडी ही अशीच लोणारीबहूल गावे आहेत.जत ही महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि आहे. म्हणून जत तालुक्यात हिंदू लोणारी बरोबर लिंगायत-लोणारी समाजाची संख्याही लक्षणीय आहे.

 

 

 

खुद्द जतमध्ये श्रीबंकेश्वर,माडग्याळमधील श्री महादेव आणि उमराणीतील हेमलिंगेश्वर ही मंदिरे अतिप्राचीन असून तीनही ठिकाणी प्राचीन हळेकन्नड किंवा कन्नड भाषेतील शिलालेख आहेत. अलीकडेच गुगवाड येथेही एक कन्नड शिलालेख आढळून आले आहे.त्यावरून जत तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा पराक्रम या तालुक्याने पाहिलेला आहे.विजापूरच्या आदिलशाहाचा सरदार बहलोलखान याच्या चतुरंग सैन्याचा प्रतापराव गुजर यांनी उमराणीजवळ पराभव केला आणि बहलोल खान शरण आला.

 

 

जतच्या डफळे घराण्याशी सुमारे चारशे वर्षाच्या पराक्रमाचा इतिहास जोडलेला आहे.राजस्थानमधील पराक्रमी दुधात हाडा चौहान राजपूत वंशाबरोबर जतच्या डफळे घराण्याचा इतिहास निगडित आहे.डफळे घराण्याला सर्जनसिंह, शामलसिंह, शार्दूलसिंह, सटवाजी अशा पराक्रमी पुरुषांची परंपरा या घराण्याला आहे.

 

उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्याची एक स्वतंत्र गादी आहे.डफळे घराण्याचे संस्थापक श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते.श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सुनबाई राणी येसूबाई यांनी 1707 ते 1738 सालापर्यंत डफळे संस्थानाचा राज्यकारभार एकहाती सांभाळला.

 

 

 

 

1738 साली राणी येसूबाई यांनी आपले सावत्रदीर खानाजीराव यांच्या चारही मुलांना दत्तक घेतले.दत्तकानंतर यशवंतराव, रामराव,भगवंतराव व मुकुंदराव हे डफळे संस्थानाचे वारस झाले.या चारही मुलांना राणी येसूबाई यांनी आपली जहागिरी वाटून दिली.थोरले यशवंतराव यांना जत,दुसरे रामराव यांना डफळापूर,तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वात लहान असलेले मुकुंदराव यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात असलेल्या हुलजंतीची जहागिरी दिली.

 

पूर्वीच्या जत संस्थानातील पण नंतरच्या हुलजंती संस्थानातील अर्थात आताच्या मंगळवेढा तालुक्यातील “लोणार”या गांवात प्राचीनकाळी जमिनीतून मीठ काढण्याची पद्धत होती.”लोणार”या गांवाचा तशा खनिज मिठासंदर्भात अभ्यासकांनी प्राचीन शिलालेखात उल्लेख केलेला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या “इतिहासाची सुवर्णपाने”या पुस्तकात केलेला आहे.

 

 

 

माडगीहाळ किंवा मडीहाळ(आज माडग्याळ ता.जत)येथील महादेव मंदिरातील शिलालेखही (27 जानेवारी 1172,नंदन संवत्सर शके 1093) प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतो.या ठिकाणी माडग्याळचा मालिंगे असा उल्लेख आहे,याशिवाय वासुबिंगे(वासुंबे ता.तासगांव)लोणार ता.जत आणि कोळनूर या गांवाचा उल्लेख आहे.पण “लोणार”या पूर्वीच्या जत संस्थानातील गांवात 12 व्या शतकात खनिजमातीपासून मीठ काढले जात होते,असा शिलालेखात उल्लेख आहे.

 

लेखक : मच्छिंद्र ऐनापुरे, जत

 

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.