विक्रमी लसीकरण ; मात्र बेपर्वाई नको

0
२१ नोव्हेंबर हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे कारण याच दिवशी भारतातील एक अब्ज लोकांनी कोरोना वरील लसीची एक मात्रा घेतली. भारतासारख्या १३६ कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशाने अवघ्या नऊ महिन्यात एक अब्ज लोकांचे लसीकरण पूर्ण करणे हा एक विक्रम आहे कारण जगातील कोणत्याच देशाला ही कामगिरी जमलेली नाही.

 

 

 

कोरोना सारख्या वैश्विक महामारीच्या लढाईत भारताने गाठलेला हा मैलाचा दगड आहे. मागील वर्षी जेंव्हा भारतात कोरोनाचा  उद्रेक झाला तेंव्हा भारत या वैश्विक महामारीशी कसा मुकाबला करेल असा प्रश्न विचारला जात होता. युरोपियन देशांच्या तुलनेत भारताची आरोग्य व्यवस्था कुचकामी आहे. भारत या वैश्विक महामारीशी मुकाबला करण्यास सक्षम नाही असाच सूर प्रसार माध्यमातून विशेषतः विदेशी प्रसार माध्यमातून ऐकायला मिळत होता. जेंव्हा भारताने लसीकरण मोहीम सुरू केली.

 

तेंव्हाही भारत लसिकरणाचे हे शिवधनुष्य उचलू शकेल का ? असा प्रश्न विचारला जात होता. १६ जानेवारीला भारतात लसीकरण सुरू झाले. पुढील १३१ दिवसांत वीस कोटी लोकांचे लसीकरण झाले. तेंव्हा लसिकरणाचा वेग कमी आहे म्हणून टीका झाली. अर्थात लसीकरण मोहिमेत सुरवातीला अनेक अडचणी आल्या.

 

 

पण या अडचणींवर आपण यशस्वी मात केली. सुरवातीला देशातील लोकांचा लोकांचा लसीवर विश्वासच नव्हता. लसीबाबत अनेक अफवा पसरवल्या गेल्या. सोशल मीडियात तर लसीकरणाबाबत अफवांचे पेव फुटले होते. त्यामुळे नागरिक संभ्रमात होते. लसिकरणाबाबत नागरिकांचा निरुत्साहाने आरोग्य विभागातील कर्मचारी हिरमुसले मात्र त्यांनी हार मानली नाही. एक व्रत स्वीकारल्याप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचारी आपले काम करत होते. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर व्हावा यासाठी जनजागृती करण्यात आली.

 

 

 

त्यात समाजातील सर्वच घटकांनी भाग घेतला. आरोग्य विभातातील कर्मचारी आणि शासकीय यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नाने भारताने लसिकरणाचे हे शिवधनुष्य पेलले. आज भारत एक अब्ज लसीकरण पूर्ण करणारा  जगातील एकमेव देश बनला आहे. याबाबत देशातील आरोग्य विभागाचे मनापासून अभिनंदन करावे लागेल. जनतेचेही आभार मानावे लागेल आणि सरकारलाही धन्यवाद द्यावे लागेल. कोरोना विरुद्धच्या लढाईत एक अब्ज लसीकरण करून आपण अर्धी लढाई जिंकली आहे.

 

 

आता अर्धी लढाई जिंकायची असेल तर जनतेने यापुढेही सतर्कता बाळगायला हवी. लसीकरण झाले तरी बेपर्वाई टाळायला हवी. लसीकरण झाले असले तरी सॅनिटायजर, मास्क आणि सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर करायलाच हवा कारण कोरोना हा असा शत्रू आहे जो कधी कोणत्या प्रकारे आपल्यावर हल्ला करेल हे सांगता येणार नाही. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा पुनरागमन केले आहे. चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने चीनमध्ये पुन्हा लॉक डाऊन करण्यात आले आहे.रशियामध्येही एका दिवसात कोरोनाने एक हजार बळी घेतले आहेत त्यामुळे बेपर्वाई आपल्या अंगलट येऊ शकते.

 

 

 

 

Rate Card
सरकारने लसीकरण मोहीम यशस्वी करून  कोरोना विरुद्धची अर्धी लढाई जिंकली आहे आता जनतेने सतर्कता बाळगून अर्धी लढाई जिंकल्यास  कोरोना विरुद्धचा आपला लढा यशस्वी होईल आणि देशातून कोरोना कायमचा हद्दपार होईल.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.