जत : राज्य शासनाकडील आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या आदेशाला जत तालुक्यातील कार्यालयाने पहिल्या दिवशी हरताळ फासला.थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी विना मास्क कामकाज करत होते.तर येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याने चित्र होते.
कोरोना महामारीने आपले रौद्ररूप कमी केल्याने लोक कोरोनाच्या बाबतीत बेफिकीर झाले आहेत. आता जनतेला कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विसर पडू लागला आहे. ‘दो गज की दुरी’ असे कधी नव्हतेच अशा प्रकारे लोक वागू लागले आहेत. लग्न असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम, लोक सोशल डिस्टन्सिंग विसरले आहेत.
मास घालणे तर आता त्यांना एक ओझे वाटू लागले आहे. वास्तविक कोरोना व्हायरस अजून हद्दपार झालेला नाही.असे असूनही, जनतेसह प्रशासन आणि सरकार देखील कोरोनाबाबत जागरूक राहताना दिसत नव्हते,मात्र राज्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्क बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत.
जत शहरातील प्रांताधिकारी कार्यालय, तहसील,उपनिंबधक,पोलीस ठाणे,नगरपरिषद,पंचायत समिती,न्यायालयातही अधिकारी,नागरिक विना मास्क फिरताना दिसत होते.तर शहरातील खाजगी अस्थापना चालकाकडून बेफीकीरपणा स्पष्ट दिसत होता.