फेसबुकने नाव बदलले तरी आरोपातून सुटका नाही

0
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपल्या नावात बदल केला असून आता फेसबुकचे नवे नाव मेटा असे असणार असल्याची  घोषणा फेसबुकचे  मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतीच केली. फेसबुकचे व्हर्च्युअल रिऍलिटी  हे भविष्य असून कंपनी मेटावर्सच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे. फेसबुक,  इन्स्टाग्राम आणि व्हाट्सएप या तिन्ही कंपन्या मार्क झुकेरबर्ग यांच्याच अधिपत्याखाली असूनही फक्त फेसबुकचेच नामांतर करण्यात आल्याने डिजिटल विश्वात तो चर्चेचा विषय बनला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटत आहेत.  फेसबुकने नामांतर का केले असाच प्रश्न सर्वजण विचारीत आहेत. वास्तविक मागील काही दिवसांपासून फेसबुक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  फेसबुकचे माजी कर्मचारी  फ्रान्सिस हावगेन हिने महत्वाचे दस्तावेज लिक करून द्वेषयुक्त भाषणाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप फेसबुकवर केला होता. तेंव्हापासून कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.  अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र असलेल्या वाल स्ट्रीट जर्नलमध्ये हावगेन यांनी लिक केलेले दस्तऐवज छापून आल्यावर अमेरिकेत खळबळ माजली होती.

 

आता अमेरिका आणि ब्रिटनमध्ये फेसबुकची चौकशी चालू आहे. हावगेनने अमेरिकेतील सिनेट समोर साक्ष दिल्याने फेसबुकच्या अडचणी वाढल्या आहेत. या आरोपांमुळे कंपनीची छवी मलीन  झाली आहे. फेसबुकने युरोपियन युनियनमध्ये दहा हजार रोजगार निर्मिती केल्याचा दावा झुकेरबर्ग यांनी केला आहे. परंतु, या सगळ्यात त्यांना उत्तरदायी असल्याचे चुकवता येणार नाही.  तसे काही करण्याचा प्रयत्न केल्यास फेसबुक आणखी अडचणीत सापडणार यात शंका नाही.  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्रपती निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सहा जानेवारी रोजी राजधानी वाशिंग्टन येथील कॅपिटल बिल्डिंगवर केलेल्या हल्ल्यात देखील फेसबुकचा हात असल्याचा आरोप झाला त्याकडेही फेसबुकने दुर्लक्ष केले आहे. केवळ अमेरिकेतच नाही तर भारतातही फेसबुकला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागत आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये  दिल्लीत झालेल्या दंग्यांची चौकशी करण्यासाठी दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सुसंवाद समितीने फेसबुकला समन्स पाठवले आहे.

 

Rate Card
फेसबुकने समन्सला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु, न्यायालयाने फेसबुकची याचिका फेटाळली आहे. समितीला समन्स पाठवण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर  हल्ला करण्यासाठी फेसबुकचा वापर झाल्याचाही आरोप आहे. फेसबुकवर खोटे वृत्त ( फेकन्यूज ) पसरवण्याचाही आरोप आहे. द्वेषमुक्त  भाषण आणि खोटे वृत्त रोखण्यासाठी फेसबुक कोणते पाऊल उचलणार आहे याबद्दल त्यांना दिल्ली विधानसभेने विचारणा केली आहे. भारत आणि अमेरिकेप्रमाणे संपूर्ण जगातून जातीय हिंसाचार पसरवल्याचा आरोप फेसबुकवर होत आहे. या आरोपांतून वापरकर्त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठीच फेसबुकने आपले नाव बदलले आहे असा आरोप  फेसबुकच्या धोरणा विरोधात असलेल्या एनजीओंनी केला आहे.  फेसबुकने आपले नाव  आणि लूक बदलून मेक ओव्हर केला तरी आरोपातून फेसबुकची सुटका झालेली नाही.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.