जत : जत शहरासह तालुक्यातील अनेक जणाना व्यवसायासाठी बँका कर्ज देत नसल्याने शहरी व ग्रामीण अनेक लघु व्यावसायीक सावकाराच्या तावडीत सापडले असून मासिक,आठवडे,दररोज व्याज वसूली होत असल्याने नफा सावकाराच्या घशात जात आहे.कोरोनातून सावलेले व्यवसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत. सावकाराच्या या जाचाने अनेकांना आता आपली दुकानदारी गुंडाळ्याचे दिसत आहे.त्यात गेल्या दोन वर्षात व्यवसायिकांना कोरोनाने पिळून काढले आहेत.
त्यात दुकानचे भाडे,कामगार पगार,घरखर्च व सावकाराचे आवाढव्य व्याज यामुळे काही व्यवसायिकांनी गाव सोडले आहे,तर काहींनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे एकादा खाजगी सावकाराच्या तगाद्याने व्यवसायिकांने आत्महत्ये सारखे पाऊल तर हेच सावकार थेट त्यांच्या कुंटबियाना गुन्हा दाखल होऊ नये म्हणून धमकावतात.त्यामुळे अनेक वेळा असे गुन्हे दाखल होत नाहीत. परिणामी सावकार दुसऱ्या एकाद्या व्यवसायिकांची पिळवणूक करण्यास मोकळा होतो.
जत शहरात ठिकाणी बेरोजगारांना आपले व्यवसाय सुरू केले आहेत.व्यवसाय वाढीसाठी कोणत्याही बँका त्यांना कर्ज देत नाही. त्यामुळे कुणाच्या तरी माध्यमातून सावकारी कर्ज काढले जाते. अनेक छोट्या व्यवसायिकांनी सावकाराकडून कर्ज घेतले आहे. नियमित परतफेड करूनही पैसा फिटत नसल्याने व्यावसायिक आता अडचणीत आले आहे. फायनान्सच्या नावाखाली सुशिक्षित बेरोजगार व छोट्या व्यावसायिकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा करून त्याची लूट सर्रास होत आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक त्रस्त आहे. शिक्षण घेवून नोकर्या मिळत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरी शोधण्यापेक्षा आपला मोर्चा छोट्या व्यवसायांकडे वळविला आहे. परंतु राष्ट्रीय बँका कर्ज मंजूर करीत नाही. विविध महामंडळे केवळ नावापुरतीच आहे.
त्यामुळे नाईलाजास्तव हे बेरोजगार खासगी सावकारांकडे जातात व त्यांच्या या लाचारीचा पुरेपूर फायदा सावकार मंडळी उचलतात.अंगावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे सध्या छोटे व्यावसायिक डबघाईस आले आहे. व्यवसाय वाढीच्या आशेने त्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड करणे तर दूरच व्याजातच त्यांचा सुरू असलेला व्यवसायसुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे.
उच्चशिक्षित तरुणही चहा टपरी, पानटपऱ्या, फळ विक्री, हॉटेल, प्रवासी वाहतूक आदी व्यवसाय करू लागले आहे. परंतु अनुभव नसल्यामुळे आणि अंगावर कर्ज असल्यामुळे त्यांना या व्यवसायात आवश्यक परतावा मिळत नाही. सावकाराची माणसे वसुलीसाठी येतात. त्यांना निमुटपणे व्याजाचा हप्ता न दिल्यास ते धमकावतात,अन्यथा आधीच घेतलेले बँकेचे धनादेश बँकेत टाकण्याची धमकी देतात. फायनान्स या गोंडस नावाखाली छोट्या/मोठ्या व्यवसायिकाचे शोषण या अवैध व्यावसायिकांनी सुरू केले आहे. हप्ता चुकाला की सावकराची माणसे येतात. धाक दपट करात. कार्जातून घेतलेली वस्तू उचलून नेतात. असे अनेक प्रकार सध्या शहरासह तालुक्यात सुरू आहेत. फायनान्सच्या नावाखालीही लूट सुरू असल्याचे चित्र आहे.