जत : शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट जनावरांचा रात्रंदिवस वावर वाढला आहे. यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे.अनेक गाई थेट नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ आली आहे.
हो सगळा प्रकार दिसत असतानाही नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे मोकाट जनावराच्या हल्ल्यात एकाद्या नागरिकांचा जीव गेल्यावर यंत्रणा शहाणे होणार काय ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
शहरातल्या प्रमुख रस्त्यावरच ही जनावरे ‘रास्ता रोको’ करत असल्याने वाहन चालक पुरते वैतागले आहेत.जत शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून याचा त्रास भाजीपाला,फळ विक्रेत्यांसह वाहन चालकांना होत आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ही जनावरे बिनधास्त शिरकाव करत असून मांडलेल्या भाजीपाल्यात बिनदिक्कत तोंड घालतात. ही जनावरे इतकी निविलेली आहेत की,त्यांना काठीने मारले तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. या जनावरांमुळे विक्रेत्यांचे मात्र नुकसान होत आहे.जत शहरात शंभराहून अधिक मोकाट जनावरे आहेत.
ही जनावरे रात्री आणि दिवसा तहसील कार्यालय, सांगली रोड,विजापूर रोड, अथणी रोड, निगडी, शेगाव रोडवर बैठक मारून बसलेली असतात. त्यांना हाकलले तरी ते पुन्हा परत येऊन बसतात. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांना त्रास तर होतोच पण वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. या जनावरांमुळे शहरातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. त्यातच या रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर कमालीचा वाढला असून त्याचा अनेकदा वाहतुकीवर परिणाम होत आहे.
रस्त्यांवर मोकाट जनावरे असल्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मार्ग काढणेही कठीण होत आहे. या जनावरांमुळे अनेकदा वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी होत आहे.
जनावरे पकडण्याचे टेंडर गुलदस्त्यात
जत नगरपरिषदेने शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी अनुभवी संस्थाकडून टेंडरची मागणी केली होती.तशी जाहीरातही वृत्तमान पत्रात छापण्यात आली होती.मात्र त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यात आहे.मात्र शहरात मोकाट जनावरांचा नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे.