जत,संकेत टाइम्स : उमदी पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे जत पुर्व भाग गुन्हेगारीकडे झुकताना दिसत असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे.जत पूर्व भागातील उमदी पोलीस स्टेशनाच्या हद्दीत अनेक गावांत मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे , गुंडगिरी, खाजगी सावकारी, हातभट्टी देशी दारूसह, मटका, जुगार यासारखे व्यवसाय वाढले आहे. त्यातून दहशत व गुंडगिरीचे प्रमाण वाढून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याबाबत नागरिक सातत्याने तक्रारी करतात मात्र उमदी पोलीस स्टेशन कडून थातूर-मातुर व जुजबी कारवाई करून फार्स करण्यात येत आहेत.परत दोन-तीन दिवसाने ‘अवैद्य धंदे’ जैसे थे चालू राहत आहेत. त्यांच्यावर ठोस आणि कडक कारवाई केली जात नाही. कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करणे अपेक्षित असताना तशी कारवाई मात्र होत नाही त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
उमदी पोलीस ठाण्यातील काही पोलिस आपल्या पदाचा गैरवापर करून अर्थपूर्ण गरजा भागवत आहे. मात्र यामुळे अवैध व्यावसायिकांचे चांगलेच फावते आहे. उमदी पोलीस व विशेष पथकांना दिल्या जाणाऱ्या हप्तेबाजीमुळे तालुक्यात अवैध धंदे बिनबोबाट सुरू आहेत. या धंद्यांना राजाश्रय देण्यासाठी पोलीस ठाण्याचे चार चार व विशेष पथकाचे विशेष वसूलीवाला लावल्याचे वास्तव चित्र आहे. आज वास्तविक पाहता उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात राजरोसपणे सुरू असलेले दारू, मटका, जुगार अड्डे व इतर अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. पोलिस, अवैध व्यावसायिक आणि त्यांच्या दलालांच्या लागेबांध्यामुळे अवैध धंदे बोकाळले आहेत. तालुक्यात जत,उमदी येथे पोलीस ठाणे असतानाही अवैध धंद्यांनी फास आवळल्याचे दिसून येत आहे.तालुक्याच्या गावागावात खुलेआम अवैध गावठी दारू, मटका, जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
त्याशिवाय वाळू तस्कर सुसाट आहेत.असे अवैद्य धंदे चालक व त्यांच्या पाठीशी असणाऱ्या राजकीय व्यक्तींचा वावर पोलिस ठाणे आवारात असतो.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. परिणामी अशा धंद्यामुळे गावागावात उपद्रव मूल्य वाढत आहे. याला स्थानिक पातळीवर नागरिकांनी विरोध केल्यास गुंडांकडून स्थानिकांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे.याला पोलिसांचाच छुपा पाठिंबा असतो असा आरोप केला जातो.
जत पूर्व भागातील मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैध धंदे स्पेशल पथक’ नेमून तात्काळ बंद कण्यात यावे कायमस्वरूपी अशा धंद्याना आळा घालण्यात यावे. काही पोलिसांचे अशा धंद्याना पाठबळ आहे अशा हप्तेबाज पोलिसांची गोपनीयरित्या चौकशी करून त्यांची उमदी पोलीस स्टेशनमधून उचलबांगडी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.