जत,संकेत टाइम्स : जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गालगत असणाऱ्या घराजवळच्या चंदनाची झाडे तस्करांनी पळवून नेहल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली आहे. याबाबतची माहिती जत पोलीसांना देऊनही त्यांनी पंचनामा केला नसल्याने पोलीसाचे तस्करांना पाठबळ आहे काय असा संशय व्यक्त होत आहे.
शहरातील विजापूर महामार्गालगत माळी पार्क येथे डॉ.शिवानंद माळी यांचा बगला व शेती आहे.बंगल्याजवळ त्यांनी काही चंदनाची झाडे लावली असून झाडे सात-आठ वर्षाची आहेत.अगदी मार्गालगत डॉ.माळी यांचा बगीचा आहे,त्यात चंदनासह अनेक दुर्मिळ,औषधी झाडे आहेत.गुरूवारी मध्यरात्री टेहाळणी केलेल्या चंदन तस्करांनी चार मोठ्या चंदन वृक्षाचे झाडे कटरने कापून मुख्य खोड पळवून नेहले आहेत.

यात सुमारे ५० हजाराचे चंदन चोरीला गेल्याचा अंदाज आहे.याबाबत डॉ.शिवानंद माळी यांनी जत पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली.ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पंचनाम्यासाठी कर्मचारी पाठवितो.तुम्ही पुढे चला म्हणून डॉ.माळी यांना पुढे पाठविले मात्र रात्री उशिरापर्यत एकही पोलीस कर्मचारी घटनास्थळी फिरकला नसल्याचे डॉ.माळी यांनी सांगितले.त्यामुळे पोलीसांविषयी संशय व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात घरफोडी,चोरी,चंदन तस्करांनी धुमाकूळ घातला असून जत पोलीसांच्या ढिलाईमुळे चोरटे,तस्कर बेधडक कार्यक्रम करत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
जत येथील डॉ.शिवानंद माळी यांच्या घरासमोरील तोडलेली चंदनाची झाडाचे बुंधे