सांगली : सांगली वन विभाग कार्यालयात दुरध्वनी संदेशाव्दारे सांगली टिंबर एरिया परिसरातुन जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात गवा वन्यप्राणी दिसून आल्याबाबत दि. 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 4.30 वाजता माहिती मिळाली.
त्यानुसार उप वनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वन परिक्षेत्र अधिकारी युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वन विभागाकडील कर्मचारी व स्वंयसेवी संस्था सदस्य यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून गवा वन्यप्राण्याची शोध मोहिम हाती घेतली. रात्री 1.30 च्या दरम्यान गवा वन्यप्राणी रेस्क्यु व्हॅनमध्ये येवून बंधीस्त झाला. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करुन नैसर्गिक अदिवासात मुक्त करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक विजय माने यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना उपवनसंरक्षक विजय माने म्हणाले, सकाळी 7 च्या सुमारास गवा वन्यप्राणी मार्केट यार्ड मधील देवसेल कार्पोरेशन इमारती पाठी असल्याचे दिसून आले त्यानुसार तातडीने तिथून बाहेर पडणाऱे तिन्ही रस्ते बंद करण्याचा निर्णय घेवून वाहनांच्या सहाय्याने रस्ते बंद करुन गवा वन्यप्राण्यास एका स्थळी बंधीस्त करुन ठेवण्यात आले. तदनंतर बघ्यांची गर्दी वाढू लागल्याने सदर क्षेत्रात जमाव बंदी बाबत कार्यवाही केली. तसेच पोलिस प्रशासनाच्या मदतीने तसेच वन विभागाकडील इतर तालुक्यातुन बोलविण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून गर्दी पांगविण्याकरीता प्रयत्न करण्यात आले. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष यांना बाजार समिती मधील सर्व आस्थापना बंद ठेवण्याबाबत वन विभागाकडुन विनंती करण्यात आली.
त्यानुसार जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी तातडीने सर्व आस्थापना प्रमुखांना संदेश देवून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बाजार समितीतील लोकांचा वावर कमी होऊन जिवीत व वित्तहानी होण्याचा धोका टळण्यास सहकार्य लाभले.
गवा वन्य प्राण्यापासून नजीकच्या अंतरात कोणीही फिरकणार नाही, जेणेकरुन गवा वन्य प्राण्यास त्रास होवून बिथरेल अशी दक्षता घेण्यात आली. तदनंतर जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी सांगली, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी कोल्हापूर वनवृत्त व Rescue Charitable Trust Pune स्वयंसेवक संस्था यांना पाचारण केल्यानुसार त्यांचे आगमन झाले. गवा वन्य प्राण्यास कोणतीही इजा न होता तसेच जिवीत व वित्त हानी टाळून बचावात्मक कार्य कसे करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तदनंतर सह्याद्री व्याघ्र राखीव कराड, यांच्या कार्यालयाकडून वन्यप्राणी रेस्क्यु व्हॅन मागविणेत आले व सदर वाहनामधुन गवा वन्यप्राण्यास सुखरुप बाहेर काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले.
गवा वन्यप्राणी रेस्क्यु व्हॅनमध्ये येण्याकरीता वाहनाच्या उंची इतका रॅम्प तयार करण्यात आला. या कार्यवाहीमध्ये वन्यजीव विभाग, महसुल विभाग, महापालिका, पशुवैधकीय विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, RESQ पुणे संस्था, WRC सांगली व इतर स्वंयसेवी संस्था नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे उपवनसंरक्षक विजय माने यांनी सांगितले.