सर्वसमावेशक विकास ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

0
Rate Card

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त वृत्तपत्रे आणि माध्यमांना दिलेल्या संदेशात मी राज्यातल्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद दिले. काही जणांनी मला विचारले की, धन्यवाद कशासाठी? मी त्यांना म्हणालो, मी मुख्यमंत्री म्हणून या खुर्चीवर बसलो असलो, तरी आज जी काही वाटचाल झाली आहे आणि जे काही सर्वसामान्यांसाठी साध्य करू शकलो हे सगळे तुम्हा लोकांचे सहकार्य आणि सहभागाशिवाय शक्य झाले नसते. त्यामुळे सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. मी नेहमी म्हणतो की कुणी मुख्यमंत्री म्हणून माझी प्रशंसा करत असेल, तर ते आमच्या सगळ्या टीमचे श्रेय आहे, माझ्या एकट्याचे नव्हे आणि म्हणूनच सगळ्यांना धन्यवाद!

                                                                                    उद्धव बाळासाहेब ठाकरे

                           मुख्यमंत्री

गत दोन वर्षे बघता-बघता गेली, असे म्हणणे आपल्या सर्वांसाठी धाडसाचे आहे. होय, धाडसाचेच. कारण जगावरच संकट आले होते. तसे ते आपल्या राज्यापर्यंतही पोहोचले. निसर्गानेही आपली सलग दोन वर्षे परीक्षा घेतली. पण आपण जिद्द, चिकाटी सोडली नाही. मोठ्या हिमतीने इथवर आलो आहोत, कणखरपणे उभे राहून आपण जगासमोर संकटावर मात करण्यासाठी वाटा खुल्या केल्या. कोविड-19चा मुकाबला चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल देशात, जगात आपली प्रशंसा झाली. अर्थात आत्मसंतुष्ट न होता आपण आताही काळजीपूर्वक पण आत्मविश्वासाने पुढे जात आहोत. यापुढेही आपल्याला अशीच एकजुटीने खंबीरपणे, ठामपणे पावले टाकायची आहेत.

 

 

दशसूत्रीनुसार कारभार

            मला आठवतेय, मुख्यमंत्री म्हणून मी मंत्रालयात घेतलेल्या पहिल्याच प्रशासकीय बैठकीत ‘जनतेमध्ये हे सरकार आपले आहे असे वाटावे असा विश्वास निर्माण करू या,’ असा निर्धार व्यक्त केला होता. त्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि प्रशासनाला संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीला डोळ्यांसमोर ठेऊन काम करण्याचे आवाहनही केले होते. सांघिक भावनेने, एकसंध टीम म्हणून काम करणारे-लोकाभिमुख शासन-प्रशासन अशीच आमची या दोन वर्षांतील वाटचाल राहिली आहे. संघर्ष तर होतच असतात. पण आम्ही संवादाचा धागा तुटू दिला नाही. अनेकांना जोडून घेऊन, सोबत घेऊन पुढे जात आहोत.

 

आव्हानांवर मात करणारे राज्य

            आव्हाने येतच असतात. पण आलेल्या आव्हानांवर मात करणारा आणि येऊ घातलेल्या आव्हानांना तिथेच गारद करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला महाराष्ट्र आहे. नव्या संकल्पनांना कवेत घेणारा, विकासाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारा, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा, इतरांनाही मार्गदर्शक ठरणारा, सलोखा-सौहार्दता जपणारा आपला महाराष्ट्र आहे. महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आणि वसा घेऊन पुढे जाणारा आपला महाराष्ट्र आहे.आताचा आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी, संयुक्त महाराष्ट्राची मोट बांधण्यासाठी अनेक वीरांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांचे हे ऋण पुढच्या कित्येक पिढ्यांनाही फेडता येणार नाही. असे शौर्य, धैर्य आणि औदार्याची परंपरा लाभलेला महाराष्ट्र आपण पुढे घेऊन जातो आहोत.

देशजगासमोर आदर्श

            लोकाभिमुख प्रशासनासाठी नवनव्या संकल्पना आणि उपक्रम आपण राबवतो आहोत. कोरोनामुळे गती मंदावली असेल. पण आपण थांबलो नव्हतो, थांबलो नाही आणि थांबणार नाही, अशा निर्धाराने पुढे जात आहोत.कोरोनाच्या भयंकर स्थित्यंतरातही आपण देशातील अन्य राज्यांसाठी पथदर्शक ठरतील आणि अगदी जगानेही दखल घ्यावी असे नियोजन-व्यवस्थापन केले. आरोग्यापासून, कृषी, नगरविकास, राज्यातील रस्ते-वीज यांच्यासह पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात आपण मापदंड ठरावेत असे निर्णय घेतले. त्यातील उपक्रम-योजनांची अंमलबजावणीही प्रभावीपणे करत आहोत. यामुळेच महाराष्ट्र आज औद्योगिक, व्यापार यांसह विविध क्षेत्रातील गुंतवणुकीकरिता जगासाठी आकर्षणाचे केंद्र राहिला आहे. यापुढेही राहील अशीच धोरणे आखली आहेत. पर्यावरण आणि राज्यातील नैसर्गिक साधन संपत्तीची काळजी घेत, विकासाचा ध्यास बाळगताना पर्यावरण-निसर्ग भकास होऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आणि त्याचा पाठपुरावाही करत आहोत, याचेही मोठे समाधान आहे.

 

सरकारचा बहुतांश कालावधी हा कोविड-19 सोबत अतिशय नेटाने, नियोजनबद्ध रीतीने मुकाबला करण्यात गेला. मात्र जगाला संकटात टाकणाऱ्या या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता, आपल्या सरकारने वेगवेगळ्या आघाड्यांवर अधिक जोमाने काम करायला सुरुवात केली. संकटाचे संधीत रूपांतर केले, हे आपल्या सर्वांच्या समोर आहे. दोन वर्षांपूर्वीची आरोग्य आणि वैद्यकीय यंत्रणा तसेच साधनसुविधा आणि आताच्या सुविधा यात मोठा फरक आहे. कोविडच्या या लढ्यात आपण या सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढवल्या आहेतच, शिवाय त्या कायमस्वरूपी झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यातदेखील विविध रोग आणि साथीचा मुकाबला आपण सक्षमपणे करू शकणार आहोत.

दमदार कामगिरी

            शासन आणि प्रशासनात कुठंही नकारात्मकता नव्हती. उद्योग-गुंतवणूक, शेती, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांना घरे, रोजगार, पाणीपुरवठा, सौर ऊर्जा, पर्यावरण, पर्यटन, वने अशा प्रत्येक विभागांनी या संपूर्ण काळात सर्वसामान्यांना प्रत्यक्ष लाभ कसा मिळेल यासाठी भरपूर मेहनत घेतली. नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाहीत, तर राबवून दाखवल्या. देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणले, पर्यटन व्यवसायात रोजगाराच्या संधी निर्माण करून या क्षेत्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. तरुणांना वेगवेगळ्या कौशल्यात पारंगत करून त्यांना रोजगार मिळेल असे पाहिले.जगभरातील उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्र आकर्षणाचे केंद्र आहेच. पण महाराष्ट्रातील उद्योग निर्यातक्षम व्हावेत, यासाठी आपण महाराष्ट्र राज्य निर्यात प्रचालन परिषदेची स्थापना केली आहे. निर्यात क्षमतेच्या बाबतीत निती आयोगाच्या निर्देशाकांत राज्याने 2020 मध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात गेल्या दोन वर्षांत सुमारे तीन लाख कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक आली आहे. ऑक्सिजन स्वावलंबन धोरण आखून राज्याने आगळे पाऊल टाकले आहे.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमास चालना देण्यात आली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यामध्येही महाराष्ट्राची आघाडी राहिली आहे. कौशल्य विकासासाठीचे विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेशन तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी निती आयोगाच्या निर्देशांकातही आपले राज्य दुसऱ्या स्थानावर राहिले आहे. राज्यातील कामगारांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठीही अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले, योजना राबवण्यात येत आहेत. इमारत व बांधकामावरील कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व त्यांचे अनुदान वाटप ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. कोरोना संकट काळात या कामगारांच्या बँकखात्यात अर्थसाहाय्य जमा करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.