“कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही”

0
    असा मोलाचा सल्ला आपल्या लेखनीतून मानवजातीला देणाऱ्या, मराठी साहित्यविश्वातील धृव तारा असलेल्या, पहिले मराठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक वि.स. खांडेकर अर्थात विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्मदिवस म्हणजे 11 जानेवारी. लिखानासाठी आपले अवघे  जीवन वेचणारे खांडेकर आजही अनेकांचे सर्वात आवडते लेखक आहेत. त्यांच्या कथा या माणसाला विचार करण्यास भाग पाडतात. मानवी मन व स्वभाव यांचा  सखोल अभ्यास असलेले त्यांचे लिखान भासते. मराठीत मोठ्या प्रमाणात  रुपककथा लिहिणारे खांडेकर हे एकमेव लेखक आहेत. त्यांनी १५०हून अधिक रुपककथा लिहिलेल्या आहेत.

 

नाट्यपंढरी अशी ओळख असलेल्या, अनेक साहित्यकारांची  जन्मभूमी असलेल्या सांगली येथे जन्मलेल्या वि.स.खांडेकर यांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे चुलत चुलते सखाराम खांडेकर यांनी त्यांना दत्तक घेतले व त्यांचे नामकरण विष्णू सखाराम खांडेकर असे झाले. शिक्षकी पेशा असलेल्या खांडेकरांच्या ललित आणी वैचारिक लेखनात त्यांच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब पडले आहे. माणूस हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. सभोवताली आढळणारे दारिद्रय ,अशिक्षित, भुकेने पछाडलेली माणसे हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू होता. भोवतालच्या मानवी जीवनाचे निरीक्षण,परिक्षण सतत करीत राहून समाजाला जे सांगावेसे वाटले ते त्यांनी कथा, नाटके, साहित्य समिक्षा , साहित्य विचार,पत्रे ,आठवणी, संवाद याद्वारे सांगितले .
समाजाचे वैचारिक उद्बोधन करणे हे त्यांनी आपले ध्येय मानले होते. आपले लेखन त्यासाठी समर्पीत केले. माणुसकी हाच खरा धर्म असे माणणार्या खांडेकरांचे मानवजातीवर खरेखुरे प्रेम असलेले दिसते. अलंकारीक भाषा हा त्यांच्या लेखनातील मैलाचा दगड आहे. जीवनातील कठीण अनुभवांना भिडण्याची ताकद , सूक्ष्म निरीक्षण शक्ती , अंगभूत ध्येयवाद, भाषेची लाभलेली देणगी, मानवतावादी दृष्टिकोन अशा अनेक गुणांमुळे खांडेकरांनी कथा, रुपककथा, लघुनिबंध, कादंबरी, पटकथा , वैचारिक लेख असे विविध प्रकारचे लेखन केले.

 

वि.स.खांडेकर हे केवळ मराठीतील मान्यताप्राप्त लेखक नव्हते, तर गुजराती, हिंदी,  तमिळ या भाषांमधेही त्यांच्या कथा कादंबऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. सिंधी, कानडी, मल्याळी भाषेत त्यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या लेखन साहित्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. तसेच त्यांच्या “ययाती” या पौराणिक विषयावरील कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या बहुमोल सन्मानाचे मराठीतील पहिले मानकरी वि.स. खांडेकर ठरले. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देवून त्यांच्या समग्र कार्याचा गौरव केला.

 

खांडेकरांच्या अनेक कथांवर चित्रपट निर्मितीही झाली. त्यांचे पहिले प्रेम, उल्का, अमृतवेल, क्रौंचवध, पांढरे ढग, दोन मने, नवा प्रातःकाल, असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. व आजही नववाचकास आकर्षित करतात.बहुआयामी लेखन कौशल्य असलेल्या वि.स खांडेकर यांनी आपले जीवन जणू मातृभाषेच्या सेवेसाठी  वाहिलेले होते. तेजस्वी कल्पनाशक्ती आणी तल्लख विचारशक्ती या गुणांना शब्दप्रभूत्वाची जोड मिळाल्यामुळे खांडेकरांची भाषाशैली अलंकारीक आणी सुभाषितात्मक ठरली. 2 सप्टेंबर १९७६ रोजी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले . मराठी कादंबरी ला प्रगल्भ आणी प्रभावी करणारे वि.स.खांडेकर गेली अनेक वर्ष मराठी वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत, आणी पुढेही त्यांच्या साहित्याची अविट गोडी चाखण्यास नवनवीन वाचक तयार होत रहातीन यात कसलीच शंका नाही.
मनिषा चौधरी, नाशिक
     9359960429
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.