जत-सांगली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौकात १९६२ साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु सोळा वर्षापुर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतरास तडा गेल्याने हा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकवर्गणीतून नवा अश्वारूढ पुतळा बसविणे व जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते व शिवप्रेमीने घेतला होता. हा पुतळा तयार झाल्याने तो यावर्षीच्या शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) बसवण्यात यावा अशी लोकभावना आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा मिरजेतून शनिवारी पोलिसांनी अटकाव करूनही जत शहरात आणला आहे.
परंतु, सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही, असा आदेश दिला आहे. त्यानंतर पुन्हा वातावरण तापले आहे. माजी आमदार जगताप यांनी आम्ही जुन्याच पुतळ्याचा जीर्णोद्धार करून पुतळा बसवत असताना प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली प्रशासकीय आडकाठी आणत आहे, असा थेट आरोप करत जिल्हाधिकारी, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवाय या विषयावरून जर काही उद्रेक झाल्यास त्यास जबाबदार सर्वस्वी जिल्हाधिकारी राहतील, असा इशारा देखील दिला आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून शहरात वातावरण तंग बनले आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. म्हणून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहराला छावणीचे स्वरूप आले आहेत. मंगळवारी जवळपास एक हजार पोलिसांनी शहरात संचलन केले. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केले आहेत शिवाजी चौक, बस स्थानक परिसर, बाजारपेठ प्रमुख रस्ते, जगताप पेट्रोल पंप आदी प्रमुख ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे.