सांगली जिल्ह्यात वीजबिलांची थकबाकी १२०५ कोटींवर | थकबाकीचा तात्काळ भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित होणार

0

सांगली : जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे तसेच सार्वजनिक सेवा व इतर सर्व वर्गवारीतील ४ लाख २५ हजार ४३१ ग्राहकांच्या वीजबिलांची थकबाकी सद्यस्थितीत १२०५ कोटी २२ लाख रुपयांवर गेली आहे. या थकबाकीमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून सांगली जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. ‘कोरोना’ची तिसरी लाट ओसरल्यामुळे जनजीवन सुरळीत आहे. सोबतच वाढत्या उन्हामुळे सर्वच वर्गवारीमध्ये वाढत्या वापराने विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. दुसरीकडे थकबाकी वाढतच असल्याने वीजखरेदीसाठी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न महावितरणसमोर निर्माण होत असल्याने थकबाकी वसूलीला वेग देण्यात आला आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये घरगुती १ लाख ६० हजार ९४७ ग्राहकांकडे २२ कोटी ९२ लाख, वाणिज्यिक १५ हजार २६८ ग्राहकांकडे ४ कोटी ३६ लाख, औद्योगिक २ हजार ५२१ ग्राहकांकडे ३ कोटी ७६ लाख रुपये तसेच कृषी २ लाख ४० हजार २० ग्राहकांकडे १०२८ कोटी ५१ लाख आणि पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १४२ कोटी ४ लाख व सार्वजनिक सेवा वर्गवारीसह सर्व ग्राहकांकडे एकूण १२०५ कोटी २२ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये कृषी ग्राहकांनी दि. ३१ मार्च २०२२ पर्यंत १०२८ कोटी ५१ लाखांपैकी ५० टक्के थकबाकीचा भरणा केल्यास त्यांना उर्वरित थकबाकी माफ करण्यात येत आहे.

महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च आदींचा सर्व खर्च वीजबिल वसुलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत व चालू वीजबिलांचा प्राधान्याने भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेत थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. तसेच या वीजजोडण्यांची सायंकाळनंतर देखील विशेष तपासणी करण्यात येत आहे. या दोहोंमध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. सोबतच थकीत बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.

घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.