बाबरवस्तीची जिल्हा परिषद मराठी शाळा दुष्काळी भागातील’ओएसिस’ ; रंगराव आठवले

0
संख,संकेत टाइम्स : वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करणे, वर्षा तील सहा महिने विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन ऊसतोडीला जाणे,अशा या परिस्थितीत पांडोझरी(ता,जत)येथिल गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील पहिली द्विशिक्षकी आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील शिक्षकांनी मात्र या शाळेचे रूपच पालटले आहे.

 

 

या शाळेतील उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे व सहकारी शिक्षक अनिल पवार यांनी स्वतः शाळेत लक्ष देऊन दुष्काळी भागातील एक ओएसिस बनविले आहे, शाळेस शुक्रवारी सांगली जिल्हा परिषदचे शिक्षण विस्तार अधिकारी रंगराव आठवले यांनी भेट देऊन कौतुक केले.
बाबरवस्ती शाळेत सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी रंगराव आठवले यांनी अचानक भेट दिली.

 

 

शाळेने दोन वर्षांपूर्वी आयएसओ मानांकन मिळवले असून शाळेत बाला उपक्रम, संगणक , क्रीडा साहित्य, इ-लर्निंग, व्याख्यान धडे, ज्ञानरचनावाद,वेगळे उपक्रम,एक हजाराहून जास्त वृक्षारोपण करून शेतकऱ्यांच्या मदतीने सर्व झाडांना ड्रिप केले, मुक्त वाचनालय, व्यसन मुक्ती,  आदी उपक्रम राबवले जात आहेत.

 

गटशिक्षणाधिकारी आर.एम. साळुंखे  व केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शासन व लोकवर्गणीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

 

यावेळी रंगराव आठवले म्हणाले, ऑनलाईन शिक्षण पध्दतीत अध्ययन अध्यापनामध्ये विविध तंत्रे व पद्धती आत्मसात करून तंत्रस्नेही शिक्षक बनून काम करावे. सर्वांच्या सहकार्य व सहभागाने ऑनलाईन तंत्रज्ञान शिक्षण आज काळाची गरज निर्माण झाली आहे. बदलत्या प्रवाहाबरोबर आपण सगळे जण बदल स्विकारुन स्वतःला सिध्द केले पाहिजे.

 

विद्यार्थी विकास हेच आपले ध्येय मानून शिक्षकांनी कार्य करणे गरजेचे आहे. शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नियोजन करावे असे आवाहन केले व  सामाजिक, शैक्षणिक व निसर्ग समृद्धीचा वारसा जपण्याचे आव्हान केले.विद्यार्थी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. शाळेद्वारे राबवीले जात असलेले विविध उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळेमध्ये देखील राबविण्याचा मनोदय व्यक्त करत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांचे कौतुक केले.

 

 

शाळेची प्रगती वाखाणण्याजोगी आहे.एवढ्या दुर्गम भागामध्ये अशाप्रकारे दर्जेदार शिक्षण ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून देणारा अवलिया दिलीप वाघमारे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.या शिक्षकांच्या आपल्या विद्यार्थ्यांप्रती व आपल्या कामाप्रती असलेल्या तळमळीमुळे हे शक्य झाले असल्याचे मत व्यक्त केले.

 

यावेळी तिल्याळ शाळेतील मुख्याध्यापक विकास वायदंडे, शाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापक दिलीप वाघमारे, सहशिक्षक अनिल पवार,आदी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.