सांगलीत धान्य व फळ महोत्सव ; मनोजकुमार वेताळ

0
3

सांगली : सांगली मुख्यालयी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादीत धान्याला थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व नागरीकांना चांगल्या दर्जाचे सेंद्रीय धान्य बाजार भावापेक्षा कमी दरामध्ये उपलब्ध व्हावे या उद्देशाने धान्य व फळ महोत्सवाचे दि. ५, ६ व ७ मार्च २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी दिली.

 

या महोत्सवात शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदूळ, ज्वारी, बाजरी, खपली गहू इत्यादी तृण धान्यांची तसेच मटकी, मूग, उडीद या कडधान्यांचे व डाळींचे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री तसेच फळे व भाजीपाला माफक दरात शेतकऱ्यांकडून ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या महोत्सवात तांदळाचे १४ प्रकार, गव्हाचे ३ प्रकार, सेंद्रीय उत्पादनांचे स्वतंत्र दालन, गुळ उत्पादन या प्रकारात प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी १०० च्या वर स्टॉल ठेवण्यात येणार आहेत. महोत्सवात जतची गुळ पोळी, कडक भाकरी या सारख्या पदार्थांची विक्री होणार आहे.

 

तरुणांसाठी धान्य व इतर पदार्थांपासून प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत तृण धान्याचे आहारातील महत्व या विषयाची माहिती देखील देण्यात येणार आहे. दि. ०७ मार्च २०२२ रोजी खरेदीदार व विक्रेते संमेलन घेऊन, सांगली जिल्ह्यातील विक्रेते व खरेदीदार यांचे करार केले जाणार आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने फळ पिकांची स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेत द्राक्ष, डाळींब व इतर फळ पिकांच्या उत्कृष्ठ नमुन्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.

 

माझी वसुंधरा अभियानांतर्गत ओल्या कचऱ्यापासुन निर्माण होणाऱ्या खताची विक्री केली जाणार आहे. या अभियानांतर्गत पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश यांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे श्री. वेताळ यांनी सांगितले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here