शाहिरी परंपरेत सांगली जिल्हा आघाडीवर

0
मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

 

पोवाड्यांतून  सोळाव्या शतकात जनजागृती केली जात असे. पोवाड्यांची  कवने मनामनांत क्रांतीची ज्योत  पेटवत पोवाड्यातूनच विविध प्रसंगांचे वर्णन शाहीर अगदी  तंतोतंत करत. छत्रपती शिवाजी
महाराज यांचा पराक्रम, न्याय, दानशूरपणा, त्यांचे संघटन कौशल्य याबाबत ऐकताना  लोकांत पराक्रमाचे स्फुल्लिंग पेटते. महात्मा फुले यांनी छत्रपती  शिवाजी महाराजांवर लिहिलेला  पोवाडा आजही प्रेरणादायी ठरतो.

 

 

महाराष्ट्राच्या मातीला अशा अनेक  शाहिरांचा वारसा लाभला आहे.  वेळ, काळ आणि परिस्थितीप्रमाणे शाहिरांच्या पोवाड्यांचे विषयही
बदलत गेले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा पराक्रम सांगतानाच त्यांचे स्वराज्य…

 

 

त्यांनी केलेले पर्यावरण रक्षण… व्यसनमुक्ती, माणुसकी हाच धर्म आणि मानवता हीच खरी जात… याबाबत सांगणारे शाहीर आज झटत आहेत. नवनव्या विषयांवर नेटाने प्रबोधन करत आहेत. शाहिरी काव्यांची प्राचीन
काळापासून सुरू असलेली परंपरा  आजही अखंड सुरू आहे. तरुणांनी  व्यसनापासून दूर व्हावे, व्यायाम करावा, चांगला आहार घेत सक्षम  बनून देश सुदृढ करावा, असे  गावागावांतून पोटतिडकीने सांगत  शाहीर प्रबोधन करतात. प्रदूषणविरोधी जागृतीसाठी विविध माध्यमे वापरली जातात आहेत; मात्र शाहिरांनी डफावर थाप टाकून प्रदूषणाविषयी केलेली  मांडणी अधिक प्रभावशाली ठरते.

 

 

सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत अढळ स्थान मिळवले आहे. आजच्या टीव्ही वाहिन्यांच्या युगातही ही परंपरा अखंडित सुरू आहे. या कलेचे संवर्धन करण्यासाठी सहेतुक प्रयत्नांची गरज आहे. जिल्ह्यातील शाहिरी तसेच लोककलांसाठी प्रोत्साहन हवे ज्यांनी आपला शाहिरीचा डफ जपानची राजधानी टोकियोमध्ये वाजवला. आपली शाहिरी पताका परदेशात फडकविली ते शाहीर म्हणजे शाहीर सम्राट बापूसाहेब विभूते यांचे गुरु क्रांतिशाहिर ग.द. दीक्षित आणि क्रांतिशाहिर महर्षी र.द. दीक्षित घराण्याची शाहीर म्हणून एक नवी ओळख सांगलीने महाराष्ट्राला करून दिली आहे. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या शाहिरीतून देश स्वातंत्र्याची ज्योत फुलवली.शाहिरी वाङ्मय दृश्य माध्यम आहे.

 

तो सादरीकरणाचा प्रकार आहे. गीताकाराने लिहिलेले शब्द त्याच्या जोशात ताला-सुरात तडफदारपणे गाताना शाहिरी कला सादर होते. त्याचे स्वरूप प्रासादिक आहे.त्यात सोपेपणा, साधेपणा अशी वैशिष्ट्ये आहेत. शब्द त्याच्या जोशात ताला-सुरात तडफदारपणे गाताना
शाहिरी कला सादर होते, त्याचे स्वरूप प्रासादिक आहे. त्यात सोपेपणा, साधेपणा अशी वैशिष्ट्ये आहेत. सांगलीच्या शाहिरी परंपरेतील हिरा म्हणजेच अण्णा भाऊ साठे. त्यांनी पोवाड्यातून सामाजिक समस्या मांडल्या. शाहिरीला पोवाडे, तमाशा, वगनाट्य, लावणी, गत, कटाव, छक्कड असे प्रकार जोडले गेले. अण्णा भाऊ यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले. साधारण 1941 ते 69 या काळात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची शाहिरी तडफडादार वाजत गाजत राहिली.

 

 

आताच्या काळात शाहिरी परंपरा ही वंश परंपरागत पुढे चालू लागली आहे. अलीकडच्या काळात शाहीर देवानंद माळी व त्यांचा मुलगा पृथ्वीराज माळी, पत्नी शाहीर कल्पना माळी यांनी ही परंपरा पुढे नेली आहे. अवघे कुटुंबच शाहिरीत रंगलेय. बालशाहिर पृथ्वीराज माळीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची दखल घेतली आहे. बालशाहीर शिवतेज जाधव, बालशाहीर केतन मेंढे यांनी छाप उमटवली आहे.

 

 

शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील शाहीर सुरेश पाटील हे अनेक वर्षांपासून पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जनजागृती करत आहेत. शेती करत असताना त्यांनी शाहिरी लोककला जपली आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून ही प्रबोधनाची परंपरा चालू ठेवली आहे. शाहिरी काव्याची परंपरा फार प्राचीन असून ती आजतागायत अखंडितपणे चालू आहे.
जिल्ह्यातील ‘प्रतिसरकार’च्या चळवळीला बळ देण्यासाठी कुंडलचे शाहीर शंकरराव निकम यांचा नावलौकिक विदर्भापर्यंत पोहोचला होता. त्यांच्या आश्रयाखाली ‘लालतारा’ कलापथक शाहीर राम लाड (कॅप्टन भाऊ) चालवून स्वातंत्र्याविषयी लोकजागृती करीत.

 

वाळवा तालुक्यात या काळात शिगावचे शाहीर संजीवनी पाटील; तर फार्णेवाडीत दौलत खोत शाहीर होते.  जिल्ह्यात पोवाडे गाणाऱ्या शाहिरी परंपरेत रमजान मुल्ला (बागणी), शाहीर खानजादे (चिकुर्डे)), आप्पाण्णा आवटी (आष्टा), महिपती पत्रावळे (शिराळा), शाहीर बापूसाहेब विभूते (बुधगाव), देवगोंडा,  शाहीर शंकरराव आंबी (तुंग), शिदगोंडा पाटील (शिरगाव-नांद्रे), शाहीर सदानंद (खटाव) यांची नामांकित शाहिरी गाजत होती.
1960 नंतर वाळवा तालुक्यातील मालेवाडी येथील
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या ‘तानाजीचा
पोवाडा’ आणि ‘बांगलादेशचा पोवाडा’ यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

 

 

1980 नंतर ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून खूपच लोकप्रिय ठरले; विशेष म्हणजे त्यांचा पोवाडा ऐकताना आजही त्यांचे अस्तित्व जाणवते. त्यांची परंपरा आज अतुल व संभाजी देशमुख हे चालवितात. प्रबोधन आणि लोकरंजन या बाबतीत बुधगावचे शाहीर बापूसाहेब विभूते यांनी महाराष्ट्रात नाव कमावले आहे. त्यांची परंपरा आज आदिनाथ व अवधूत विभूते चालवितात. शाहीर नामदेव माळी (अळसंद), शाहीर शामराव जाधव (हिंगणगाव), शाहीर राम यादव (रामापूर),,  राम जाधव-मिरज; तर महिला शाहीर शहाबाई  यादव, सोनार काकी (रेणावी), अंबुताई विभूते यांचा  उल्लेख करता येईल, 1990 पर्यंत या शाहिरांचा  प्रभाव जिल्ह्यात होता.

 

 

सध्या शाहीर बजरंग आंबी यांनी शाहिरी  पोवाड्याबरोबर ग्रामस्वच्छता, ‘निर्मलग्राम’  चळवळीसाठी गीते सादर करून राष्ट्रपतिपदकापर्यंत  मजल मारली आहे. अलीकडेच साताऱ्याला राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये राज्यभरातून 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चार वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धेमध्ये सांगलीच्या बजरंग आंबी यांनी बाजी मारत ‘शाहीर महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार मिळविला आहे.शाहीर यशवंत पवार- रेठरेधरण,शाहीर आनंदराव सूर्यवंशी-अंकलखोप, दीपककुमार आवटी-आष्टा, शाहीर गुलाब मुल्ला-रामानंदनगर,  शाहीर देवानंद माळी-सांगली, आलम बागणीकर,  आकाराम थोरबोले- शिराळा, शाहीर जयवंत  रणदिवे-दिघंची यांनी या बदलत्या विज्ञान व  जागतिकीकरणाच्या काळातही शाहिरीचा बाज टिकून ठेवलेला दिसतो.

 

 

या शाहिरी परंपरेत आज महिला शाहीर म्हणून चिंचणी तासगावच्या अनिता  खरात, बुधगावच्या कल्पना माळी यांचा नामोल्लेख क्रमप्राप्तच आहे. ऐतिहासिक पोवाड्याबरोबरच समाजातील अनिष्ट प्रथा,  परंपरा, अंधश्रद्धांवरही शाहिरीतून  निर्भीडपणे प्रहार करून सातत्याने जागृती सुरू असते. समाज एकसंध राहावा, प्रेम आणि सलोख्याने राहावा यासाठीही शाहीर धडपडतात.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.