- फळ आणि धान्य महोत्सवास सुरूवात
- तीन दिवस सुरू राहणार महोत्सव
- विविध फळ आणि धान्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन
सांगली : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्य व फळांना योग्य मोबदला मिळण्यासाठी धान्य व फळे महोत्सवा सारखे कार्यक्रम खूप उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार शेतीमाल ग्राहकांना थेट उपलब्ध होत आहे त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यास अशा महोत्सवांचे आयोजन उपयुक्त ठरते. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथनगर, सांगली येथे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत आजपासून तीन दिवस धान्य आणि फळ महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, नगर अभियंता परमेश्वर अलकुडे, पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, उपविभागीय कृषी अधिकारी पी के सुर्यवंशी आणि एसीबी खटकाळे, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, धान्य व फळे महोत्सवात अनेक जातीचे दर्जेदार धान्य व फळे ठेवण्यात आली आहेत. याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. धान्य फळ व उत्सवामुळे शेतकऱ्यांनाही योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, शहरातील ग्राहकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दर्जेदार फळे व धान्य मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल योग्य दरात उपलब्ध होत आहे. हा महोत्सव तीन दिवस सुरू राहणार असून शहरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार बेता यांनी धान्य व फळे महोत्सवाची पार्श्वभूमी व सविस्तर माहिती दिली.