सांगली : महिलांनी परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ज्ञानाच्या कक्षा रूंदावणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर स्त्रियांनीच स्त्रियांचा सन्मान करणे आवश्यक आहे. विचारांचे स्वातंत्र्य ठेवून आत्मसन्मान जोपासणारी कामे करा, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या वतीने महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, मोहिनी चव्हाण, पोलिस उपअधिक्षक (गृह) सुरेखा दुग्गे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या विधी सल्लागार दिपीका बोराडे, सेवानिवृत्त हवाई सुंदरी कल्पना देशपांडे, लेखाधिकारी ऐश्वर्या कोळी यांच्यासह विविध विभागाच्या महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
महिलांनी आपल्या आवतीभोवती होणाऱ्या घटनांचा नेहमी चाणाक्षपणे अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर सातत्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी वाचनाची आवड जोपासली पाहिजे, यामधूनच आपले जीवन फुलेल असे सांगून अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख म्हणाल्या, जिज्ञासू वृत्तीबरोबरच जबाबदारीने वागण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. जीवनातील आव्हानांचा सामना करत असताना आनंदाने जीवन जगण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर यावेळी म्हणाल्या, महिलांनी आदर्श महिला होण्यासाठी प्रयत्न जरूर करावा पण त्यासाठी स्वत:च्या क्षमता ओळखायला पाहिजेत. स्वत: जगण्यासाठी मनाला आनंद देणारे काम करायला हवे. तसेच स्वत:च्या आवडी जपण्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. त्याचबरोबर चाकोरी बाहेर जावून आयुष्याला आनंदाने सामोरे गेले पाहिजे. चौकटीत राहून स्वत:ला न्याय देता आला पाहिजे. महिलांना फुलपांखरासारखा स्वच्छंदपणे विहार करण्याबरोबरच मोराप्रमाणे आनंदाने जगता आले पाहिजे. महिलांनी स्वत:वर प्रेम करायला शिकले पाहिजे. स्वत:च्या आवडी निवडी त्याचबरोबर करिअर यालाही प्राधान्य द्यायला हवे. समाजात आपण कुठेही मागे राहू नये यासाठी नेहमी अपडेट असणे ही आता काळाची गरज झाली आहे. याचबरोबर भारतीय संस्कृती, परंपरा याचेही जतन झाले तर खऱ्या अर्थाने महिला दिनाचा उद्देश सफल होईल, असे सांगून जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.
पोलिस उपअधिक्षक (गृह) सुरेखा दुग्गे म्हणाल्या, स्त्रीमध्ये प्रचंड प्रमाणात सहनशक्ती आहे. या सहनशक्तीचा सकारात्मक पध्दतीने वापर करून स्वत:चे जीवन समृध्द करावे. प्राधान्याने स्वत:साठी जगण्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर महिलांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यायला पाहिजे, असे सांगून त्यांनी परदेशात सेवा बजावलेल्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच त्या त्या देशातील महिला धोरणांबाबत माहिती सांगितली.
या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त हवाई सुंदरी कल्पना देशपांडे यांचे महिलांचा मानसिक ताण व त्यावरील उपाय याबाबतचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी महिलांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या निर्झरा काव्यसंग्रहातील कवितेचे वाचन करण्यात आले.
प्रास्ताविकात महिला व बालकल्याण कार्यालयाच्या विधी सल्लागार दिपीका बोराडे यांनी महिला दिनाच्या आयोजनाबाबतचा इतिहास सांगून जिल्हा व महिला बाल विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगितली. आभार ऐश्वर्या कोळी यांनी मानले.