आरेवाडीच्या पावनभूमीत साहित्य संमेलनाची चर्चा

0
3

आरेवाडी : धनगर समाज साहित्य व संस्कृती संस्थेच्या वतीने बिरोबा नगरीमध्ये पहिले धनगर साहित्य संमेलन घेण्याचा मनोदय असून त्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा काल आरेवाडी येथे पार पडली. स्थानिक प्रशासनातील पदाधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व साहित्यिक यांच्यामध्ये विचार विनियम झाला.

आरं, आरं, आबा आता तरी थांबा, या चित्रपटासह ७ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक व लेखक डॉ. बालाजी वाघमोडे, त्रिपुरा विद्युत मंडळाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे मुख्य अभियंता तथा जेष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे, अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कविता असलेले अहिल्यागाथाकार कवी गोविंद काळे, जय मल्हार मालिकेचे तज्ञ सल्लागार डॉ. विठ्ठल ठोंबरे, अखंड ४ दशके साहित्य संमेलने घेवून अनेक ज्येष्ठ साहित्यिकांना विटा येथे आणणारे रघुराज मेटकरी, सोलापूर विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत कोकरे, मराठीतील साहित्यिक व जागतिक पातळीवरील कृषी शास्त्रज्ञ डॉ. शिवाजीराव ठोंबरे अशा अनेक दिग्गज आणि महनीय साहित्यिक, विचारवंत व जाणकार व्यक्तिमत्त्वांचा सक्रिय सहभाग असलेल्या या धनगर समाज साहित्य व संस्कृती संस्थेच्या वतीने हे साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. संस्थेच्या पहिल्या ऑनलाईन मीटिंगमध्ये पहिले साहित्य संमेलन पवित्र भूमी आरेवाडीच्या बिरोबा नगरीमध्ये व्हावे, असे अनेकांनी बोलून दाखविले होते.

त्या अनुषंगाने बिरोबा दर्शन, परिसर पाहणी, स्थानिक प्रशासन यांचेशी प्राथमिक चर्चा आणि परिसरातील शाळा व विद्यार्थी यांच्या सहभागासाठी शाळा भेटी असा कार्यक्रम काल पार पडला. यासाठी साहित्यिक डॉ. श्रीकांत कोकरे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक नारायण मोठे देसाई, माजी पोलीस उप अधीक्षक व सुप्रसिद्ध गीतकार, कवी धनाजी सोलंकर आणि माणदेश महाविद्यालय जुनोनीचे प्रभारी प्राचार्य व साहित्यिक प्रा. मुकुंद वलेकर आदी मान्यवर आले होते. दरम्यान बिरोबा बन येथे साहित्य संमेलन घेण्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल आरेवाडी येथे या संमेलनात शिक्षण क्षेत्रातील सहभाग कसा वाढेल, यावर विचारविनियमय झाला.

यावेळी आलेल्या मान्यवरांनी साहित्य संमेलन घेण्यासाठी अपेक्षा व्यक्त केल्या. त्याला आरेवाडीतून सकारात्मक प्रतिसाद देत, गाव पातळीवर चर्चा करून सहकार्य करण्याचा शब्द यावेळी दिला. आपल्या या सांस्कृतिक व धार्मिक ठिकाणी या संस्थेचे पाहिले वहिले साहित्य संमेलन पार पडत आहे, ही बाब आरेवाडीकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. पण त्यासाठी एक आरेवाडीकर म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.

आरेवाडीकरांचे कौतुक

यानिमित्त आलेल्या साहित्यिक मान्यवरांनी आपल्या श्री बिरोबा स्टडी सेंटरला भेट दिली. दोन सेवानिवृत्त डीवायएसपी, एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधन मार्गदर्शक आणि एक प्रभारी प्राचार्य असेलेल्या ज्येष्ठ साहित्यीकांनी आपल्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी अभ्यास केंद्रातील सोयीसुविधा व अभ्यास करत असलेली मुले पाहून समाधान व्यक्त केले. एखाद्या देवालयाच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम असेल. आणि हा उपक्रम एक आदर्श व प्रेरणादायी ठरेल, असा आशावाद व्यक्त करत आरेवाडीकर आणि मायभूमी आरेवाडी व्हाट्सअप ग्रुपचे त्यांनी कौतुक केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here