हिंदी चित्रपट आणि पोलीस

0
थरारक गुन्हेगारी कथांचे आकर्षण बॉलिवूडला नेहमीच राहिले आहे. आणि जिथे गुन्हेगारी असते,तिथे पोलीस आणि कायदा आपोआप येतोच. त्यामुळे आजही हिंदी चित्रपट गुन्हेगारी, पोलीस आणि कायदा यांच्या अवतीभवती घुटमळताना पाहायला मिळतो. हिंदी चित्रपटातला क्वचितच एखादा हिरो असेल,ज्याने पोलिसांची ‘खाकी वर्दी’ घातली नसेल. आतापर्यंत बरेच हिंदी चित्रपट पोलीस आणि कायद्याच्या आधार घेऊन बनवले गेले आहेत आणि आजही बनवले जात आहेत. हा विषय कधीच थांबणारा नाही. कारण गुन्हेगारी जिथे आहे,तिथे बॉलिवूड असणार आहे.

 

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला लोकप्रिय चित्रपट म्हणजे ‘किस्मत’.1943 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट कोलकात्यातील रोक्सी थिएटरमध्ये तब्बल 187 आठवडे चालला होता. या चित्रपटाद्वारा पहिल्यांदाच गुन्हेगार क्षेत्राशी संबंधित हिरो पडद्यावर दाखवण्यात आला होता. अशोक कुमार यांनी यात पाकिटमाराची भूमिका साकारली होती. 1975 मध्ये आलेला ‘शोले’ चित्रपट एका दरोडेखोराने एका रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याच्या कथानकावर आधारलेला होता. दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. प्रेक्षकांना अशा चित्रपटांमध्ये रुची आहे,हे लक्षात आल्यावर निर्मात्यांनी गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेले चित्रपट बनवायला सुरुवात केली. मग कधी ‘जंजीर’मध्ये पोलिसांची खाकी वर्दी घातलेला अमिताभ बच्चन पाहायला मिळाला तर कधी ‘शक्ती’ मध्ये याच वर्दीत दिलीप कुमार पाहायला मिळाले.
खाकीचं खणखणीत नाणं कधी कमकुवत पडल्याचं पाहायला मिळालं नाही.नाना पाटेकर ‘अब तक छपन्न’मध्ये गुन्हेगारांशी आपल्या स्टाईलने भिडतो. ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ मध्ये अक्षय कुमार पोलीस इन्स्पेक्टर बनला होता तर सैफ अली खान फिल्मस्टार. याशिवाय अक्षय कुमारने ‘मोहरा’, ‘राउडी राठौड़’मध्ये तर अमीर खानने ‘सरफरोश’ मध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा भूमिका साकारल्या. नवाजुद्दीन सिद्दीकीनेदेखील ‘रात अकेली है’ मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची भूमिका निभावली. अजय देवगनने साकारलेल्या ‘गंगाजल’ मधील एसपी अमित कुमारच्या भूमिकेचे तर जोरदार स्वागत झाले. चित्रपट हिट झाला. अजयच्या ‘सिंघम’मधील बाजीरावलादेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. शशी कपूर यांनी साकारलेली ‘दिवार’ मधील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका आजही आठवली जाते.यातल्या ‘मेरे पास मां है…’ या वाक्याने प्रत्येक वेळी टाळ्या घेतल्या आहेत.
मधल्या काळात मिथुन चक्रवर्ती, धर्मेंद्र, सनी देओल यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका केल्या. त्या पसंदही केल्या गेल्या. अलिकडच्या काळातही गुन्हेगारीवर आधारित अनेक चित्रपट आले. मुंबईतल्या गँगस्टरवर तर अनेक चित्रपट येऊन गेले आणि अजूनही यात खंड पडलेला नाही,कारण हा विषय प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या  ‘सूर्यवंशी’ मध्ये अक्षय कुमार डीसीपी वीर सूर्यवंशी यांची भूमिका साकारली आहे. यात तो मुंबईच्या दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखाच्या भूमिकेत आहे. फक्त अक्षय कुमारच नाही तर अजय देवगन याच चित्रपटात डीसीपी बाजीराव सिंघम आणि रणवीर सिंग इन्स्पेक्टर संग्राम भालेरावच्या रुपात दिसणार आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ ही दोन्ही कॅरेक्टर एकत्र पाहायला मिळाली आहेत. संपूर्ण चित्रपट पोलीस आणि कायद्याच्या डावपेचावर आधारित आहे. ‘अंतिम : द फाइन ट्रुथ’मध्ये सलमान खान एका शीख पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत  आहे. सलमानने यापूर्वी साकारलेल्या ‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ मधील पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिका लोकांनी डोक्यावर घेतल्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राधे’ चित्रपटातदेखील सलमान अंडरकवर पोलीस ऑफिसरच्या रुपात दिसला. सिनेमागृहे बंद असल्याने हा चित्रपट ओटीटीवर दाखवण्यात आला.

 

साहजिकच या चित्रपटाला अपेक्षित यश मिळणं दुरापास्त होतं. हा चित्रपट घाट्यात गेला. ऍक्शन हिरो म्हणून ज्याला पसंद केलं जातं, तो जॉन अब्राहिम ‘अटॅक’ चित्रपटात खाकी वर्दीत दिसला. बऱ्याच वर्षातून ‘भूत पुलिस’मध्ये सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळला. ‘बेलबॉटम’मध्ये अक्षय कुमार पोलीस कॉन्स्टेबलबरोबरच जासुसाची भूमिका साकारली असून तो चोरांची गँग पकडताना पाहायला मिळाला.
दबंग’ हिट झाल्याने जसा  ‘दबंग 2’ बनला, तसाच ‘सिंघम’ हिट झाला नी मग  ‘सिंघम 2’ तयार झाला. ज्याप्रकारे सलमानने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत ‘दबंग3’ बनवला,तशाच प्रकारे आता अजय देवगन पुढे सरकताना दिसत आहे. ‘दबंग’प्रमाणेच अजय देवगनचा ‘सिंघम’ हिट झाला आणि त्यामुळे त्यांचे दुसरे भागदेखील निघाले आणि हिट झाले. अजय देवगन ‘सिंघम’चा तिसरा भागही येणार आहे. रोहित शेट्टी यांनी आता त्याची तयारी चालवली आहे.
पोलिसांची वर्दी फक्त हिरो म्हणजेच नायकांनीच घातली नाही तर वेळोवेळी हिरॉईननेदेखील खाकी वर्दी घातली आहे. ‘अंधा कानून’मध्ये हेमामालिनी पोलीस इन्स्पेक्टर बनली होती. शिल्पा शेट्टी ‘दस’, तर राणी मुखर्जी ‘मर्दानी’, व ‘मर्दानी 2’, आणि बिपाशा बसूने ‘धूम2’मध्ये खाकी वर्दी घातली आहे. येणाऱ्या ‘धाकड’ चित्रपटात कंगना राणावत पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच यात अनेक स्टंट सीन असणार आहेत. ‘शतरंज’ मध्ये एकता जैनदेखील पोलीस बनली आहे.विद्या बालन ‘शेरनी’  चित्रपटात वनअधिकाऱ्याच्या वर्दीत दिसली. गुन्हेगारी क्षेत्रावर आधारित आणखीही काही चित्रपट येत आहेत. आयुष्यमान खुराना आपल्या ‘आर्टिकल 15’च्या यशानंतर याच विषयावरचा आणखी एक चित्रपट घेऊन येत आहे. काही चित्रपट निर्मात्यांनी आपल्या असोसिएशनकडे अशाच प्रकारची मिळतीजुळती नावे रजिस्टर्ड केली आहेत.‘सेक्शन 376’, ‘सेक्शन 302’, ‘आर्टिकल 14’, ‘आर्टिकल 35 ए’, ‘धारा 370’, ‘375 इंडियन पीनल कोड’ अशी काही ही नावं आहेत.

 

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.