पर्यावरणाची हानी टाळायची असेल तर मानवनिर्मित वणवे रोखायला हवे

0

विविध महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, राज्य व केंद्र शासन, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, काही स्वयंसेवी सामाजिक संस्था पावसाळ्यात वृक्षारोपण करतात. पावसाळ्यानंतरच्या काळातही रोपट्यांना पाणी घालून ती वाढवतात. गायी गुरांपासून, बकऱ्यांपासून त्यांना जपतात. मात्र उन्हाळ्यात ठिकठिकाणी वणवे लागून व काही समाजकंटकामार्फत वणवे लावून वर्षानुवर्षे वाढवली गेलेली ही बहुमोल निसर्गसंपदा आगीच्या भक्षस्थानी पडत असते.

 

 

वणवे लावून शहराजवळच्या डोंगरावरील हिरवाई नष्ट केली जात असते. उन्हाळ्यात लागणारे हे वणवे नैसर्गिक असल्याचे भासवले जाते पण हे वणवे मानवनिर्मितच असतात हे उघड सत्य आहे. चराईकरिता चांगले गवत यावे याहेतूने या आगी लावल्या जातात ( आग लावल्यावर चांगले व भरपूर गवत उगवते हा त्यामागचा उद्देश असतो ), लाकडू फाटा, कोळसा मिळवण्यासाठी तसेच शेती व शिकारीसाठी जमीन तयार करण्यासाठी या बहुमोल निसर्गसंपदेला आगी लावल्या जातात.या आगीत वृक्ष,वनस्पती, वन्य जीवांची हानी, स्थलांतर यामुळे जे नुकसान होत असते त्याची भरपाई होण्यास खूप मोठा कालावधी जातो.

 

 

निसर्गाची अपरिमित हानी होते. या आगीमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच पण कार्बनडाय ऑक्साईडही वातावरणात वाढतो त्यामुळे पृथ्वीचे तापमानही वाढते. एकूणच झाडांना लावल्या जाणाऱ्या या आगी म्हणजे राष्ट्रीय हानी आहे असे असतानाही या मानवनिर्मित वनव्यांकडे केंद्र व राज्याचे वने आणि पर्यावरण खाते, पोलीस दुर्लक्ष करीत असतात. आगी लावणाऱ्या या समाजकंटकावर पोलीस तसेच प्रशासन कोणतीही कारवाई करीत नाही त्यामुळेच वनव्यांच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. काही भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामुळे निसर्गाची कधीही भरुन न निघणारी हानी होत आहे म्हणूनच सरकारने या वनव्यांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

 

Rate Card

वणवे लावून पर्यावरणाची हानी करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. वनव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळायची असेल तर मानवनिर्मित वणवे रोखायलाच हवे.

 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.