पहिल्या जेटीपीएलचा मानकरी ठरला सिध्दारुड इलेव्हन, उपविजेतेपद ग्रीन वारीयर्स यांनी पटकावले
★ तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते बक्षीस वितरण
फोटो/ जत- पहिल्या जेटीपीएलचा मानकरी ठरलेल्या सिध्दारुड इलेव्हन संघाला सन्मानित करताना तुकाराम बाबा महाराज
जत,संकेत टाइम्स : आयपीएलच्या धर्तीवर जत तालुक्यात जेटीपीएल अर्थात जत तालुका प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा- २०२२ आयोजित करण्यात आली होती. प्रथम विजेतेपदासाठी जाडरबोबलाद येथील सिध्दारुड इलेव्हन विरुद्ध सोन्याळ येथील ग्रीन वारीयर्स यांच्यात अटीतटीचा सामना झाला. या सामन्यात सिद्धारुड इलेव्हन संघाने बाजी मारत जेटीपीएलचे प्रथम मानकरी होण्याचा मान पटकाविला. ग्रीन वारीयर्स संघाने उपविजेतेपद पटकाविले.
विजेत्या संघांना चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले.

जाडरबोबलाद येथे तीन दिवस साखळी पद्धतीने सामने खेळण्यात आले. क्रिकेट प्रेमी रुपेश काटे व त्यांच्या टीमने नियोजनबद्ध जेटीपीएल-२०२२ चे आयोजन केले. तालुक्यातील उत्कृष्ट २०० हुन अधिक खेळाडुंची बोली लावण्यात आली. या स्पर्धेत जत येथील सरदार फायटर इलेव्हन, जाडरबोबलाद येथील सिद्धारुड इलेव्हन, सोन्याळ येथील ग्रीन वारीयर्स, उमराणी येथील नामद इलेव्हन, माडग्याळ येथील टायगर इलेव्हन, संख येथील एस. पी. इलेव्हन , सिद्धनाथ येथील डी.एस. इलेव्हन, खंडनाळ येथील समा इलेव्हन हे आठ संघ बोलीत सहभागी झाले होते.या बोलीत संघ मालकांनी खेळाडूंना बोली लावून विकत घेतले. यावेळी संघ मालक उपस्थित होते.
साखळी पद्धतीने खेळण्यात आलेल्या सामन्यात ग्रीन वारीयर्स व सिद्धारुड इलेव्हन संघात फायनल सामना रंगला. २०-२० प्रमाणे अवघ्या तीन ओवरच्या या सामन्यात सिद्धारूड संघाने बाजी मारत जेटीपीएलचे प्रथम विजेता होण्याचा मान पटकाविला.
बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, क्रिकेट हा अनेकांच्या आवडीचा खेळ आहे. ज्या अपेक्षेने संयोजकांनी जेटीपीएल भरविले त्यांचा उद्देश पहिल्याच वर्षी पूर्ण झाला आहे. अनेक गुणवंत खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले. आजच्या तरुणाईने मैदानाकडे पाठ फिरवली आहे. मैदाने पुन्हा पूर्वीसारखी क्रीडाप्रेमीनी फुलले पाहिजेत यासाठी गावपातळीवर अशा पद्धतीचे सामने भरविणे काळाची गरज आहे.
■ पुढील स्पर्धा सोन्याळमध्ये
जेटीपीएल-२०२३ ही स्पर्धा पुढील वर्षी सोन्याळ येथे भरवाव्यात असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना केले.