सांगली जिल्ह्यातील एक लाखांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित

0

आर्थिक अडचणीमुळे महावितरणकडून कटू कारवाई

सांगली,संकेत टाइम्स : वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या दीड महिन्यांमध्ये १ लाख १५ हजार ७८० अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर १० लाख ५ हजार ७८३ अकृषक ग्राहकांकडे १९२३ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. यासोबतच लघुदाब वीजग्राहकांना थकबाकी व चालू बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.inवेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचाभरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सांगली जिल्ह्यात प्रामुख्याने ७९ हजार ६५ घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी २० लाख रुपये, ७ हजार ३९० वाणिज्यिक ग्राहकांकडे २ कोटी २४ लाख रुपये, १४९१ औद्योगिक ग्राहकांकडे ३ कोटी ७६ लाख रुपये तसेच १०७० सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे २८ कोटी रुपये, २४०५ पथदिव्यांच्या वीजजोडण्यांकडे १११ कोटी ५५ लाख रुपये व इतर अशा एकूण ९३ हजार ८४५ अकृषक ग्राहकांकडे १६१ कोटी १० लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात ७ हजार ४०५ थकबाकीदार अकृषक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Rate Card

कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झालेला आहे त्यांच्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेनुसार १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ करण्यात आले आहे. तर मूळ थकबाकी भरण्यास सहा हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. एकाच वेळी मूळ थकबाकी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकबाकीमध्ये अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे.

सध्या सुरु असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.