सांगलीतील अंकलखोप (औदुंबर) गावाची पुस्तकांचे गाव म्हणून निवड

0

 

सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
 सांगली : पुस्तकाचे गाव विस्तार योजनेंतर्गत मराठी भाषेचा विकास, प्रचार,  प्रसार व वाचन संस्कृती जोपासावी यादृष्टीने व मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना शासन राबवित आहे. पुणे महसूल विभागात सांगलीच्या अंकलखोप (औदुंबर) ची पुस्तकाचे गाव म्हणून निवड करण्यात आली असून हा सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे मत मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.
Rate Card
पुस्तकाच्या गावात विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन पर ग्रंथांनी सुसज्ज असे भव्यदिव्य दालने होणार आहेत. “पुस्तकाचे गाव” म्हणून लवकरच अंकलखोप (औदुंबर) ता. पलुस ची ओळख राज्याबरोबरच देशभरात होण्यासाठी मदत होणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होईल, असा विश्वास राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

 

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ही योजना विस्तारीत स्वरूपात सुरू करीत असताना सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील अंकलखोप (औदुंबर) या गावाची निवड करण्यात आली असून या बाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.  या अनुषंगाने संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्याकडून सदर प्रस्तावास तात्काळ मान्यता देण्याबाबत मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सदर विषयावर काल विधान भवन येथील दालनात बैठक घेऊन निर्देश दिले होते.
 पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यासाठी शासन निर्णयाव्दारे आज औरंगाबाद महसूल विभागात वेरूळ जि. औरंगाबाद, नागपूर विभागात नवेगाव बांध, जि. गोंदिया, कोकण विभागात पोंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग व पुणे विभागात अंकलखोप (औदुंबर) या गावात पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 

 

“हे ऑन वे” वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना अस्तित्वात आली असून या योजनेचे आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार तसेच वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड, योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने राज्यातील नाविन्यपूर्ण पुस्तकांचे गाव अंकलखोप (औदुंबर) येथे होणार असल्याची माहिती मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.