सांगली,संकेत टाइम्स : सांगली जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या १८ वर्षाखालील बालकांना शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क व शैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशाकरीता कमाल १० हजार रुपये पर्यंत सदर एका व अधिक कारणासाठी लाभाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थीनी आपल्या तालुक्यातील एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी अथवा संरक्षण अधिकारी कार्यालय तालुकास्तर यांच्याकडे आवश्यक त्या मुळ कागदपत्रासह विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने २५ कोटी ५३ लाख २५ हजार ५४८ रूपये इतकी रक्कम राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या रकमेचा विनयोग कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या शैक्षणिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या रकमेच्या विनयोगाकरीता सांगली जिल्ह्यासाठी कोविड-१९ मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या शैक्षणिक खर्चासाठी ८५ लाख रूपये इतका निधी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर उपलब्ध करुन दिला आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज, शाळेचे बोनाफाईड, आई/वडील कोविड पॉझिटीव्ह असल्याबाबतचा पुरावा झेरॉक्स प्रत, आई/वडील मृत्यु दाखला झेरॉक्स प्रत, बालक अथवा बालक-पालक यांचे संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेतील खातेची पासबुक प्रत, खर्चाचे विवरणपत्र, बालकाचे व पालकाचे आधार झेरॉक्स प्रत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सांगली ०२३३-२६०००४३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले आहे.