कामाला आव्हान बनवा

0
जेव्हा आपण कोणतेही काम आव्हान म्हणून स्वीकारतो, तेव्हा ते सहजरित्या पूर्ण होते. ते आपल्याला ओझे वाटत नाही.  या प्रक्रियेतून आपल्याला मानसिक दडपणही जाणवत नाही.  त्यामुळे काम सुरळीतपणे आणि कमी ताणतणावाने पूर्ण करायचे असेल, तर ते कामाला आपण आव्हानात्मक बनवणे आवश्यक आहे.  जर आपण आपले काम आव्हान बनवले नाही तर ते आपल्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते.  कुठलेही काम आपल्याला दडपून टाकत असेल तर  आपल्याला अस्वस्थ वाटू लागते आणि आपण कामापासून दूर पळू लागतो.

 

जेव्हा कधी आपल्याला कामाबद्दल चिंता वाटायला लागते, तेव्हा आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण मनापासून कामाशी जोडलो गेलो नाही.  याची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे सर्वप्रथम आपण विश्लेषण केले पाहिजे की आपण कामात व्यस्त का होऊ शकत नाही?  कारण हे विश्लेषण केले नाही तर प्रॉब्लेम कुठे आहे हेही कळणार नाही.  कधीकधी समस्या आपल्या आत असते आणि आपण ती बाहेर शोधत राहतो.  कामाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तर बऱ्याच अंशी समस्या सुटू शकते.असे म्हणतात की आपले मन एकाग्र नसले तर आपले मन कामात गुंतत नाही.  मनाला चंचल म्हटले गेले आहे.  काही अपवाद वगळता, आपल्या सर्वांचा मानवी स्वभाव एकसारखा आहे. त्यामुळे आपली कमजोरीही एकसारखीच असते.
त्यामुळे एकाग्रतेच्या अभावाच्या नावाखाली कामाकडे दुर्लक्ष करता येत नाही.  जेव्हा आपले अंतःकरण कोणत्याही कामात गुंतलेले असते तेव्हा एकाग्रता निर्माण होते.
प्रश्न असा आहे की, मन कामात कसे लागेल?  कर्म ही सर्वात मोठी उपासना मानली जाते.  याचा अर्थ जीवनात सर्वात जास्त महत्त्व कर्माला देण्यात आले आहे.  खरे तर आपण कर्माला महत्त्व देतो पण त्याची पूजा करण्याइतके महत्त्व देत नाही.  येथूनच खरी समस्या सुरू होते.  आपण कर्माला महत्त्व देत आहोत या भ्रमात राहतो पण कर्माला फारसे महत्त्व देत नाही.  कर्माला महत्त्व देण्याबरोबरच आपण इतर गोष्टींनाही महत्त्व देऊ लागतो. या प्रक्रियेमुळे हळूहळू आपली कर्माची आवड कमी होऊन इतर गोष्टींमध्ये त्याची वाढ होऊ लागते.
एक वेळ अशी येते की इतर गोष्टींमधला आपला रस इतका वाढतो की आपण कामाला बाजूला  ढकलून सोडतो.  अशा वातावरणात मन लावून काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे,जे कृतीला सर्वाधिक महत्त्व देतात, ते यशाची शिडी सहजरित्या  चढत राहतात.

 

संघर्ष करूनही जर आपले जीवन प्रगती करत असेल तर हेदेखील एक प्रकारचे यशच आहे.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य थांबलं नाही पाहिजे. अपेक्षित यश मिळो अथवा न मिळो, कृतीला अत्यंत महत्त्व देणाऱ्यांच्या जीवनात निराशेला स्थान नसते हे निश्चित.  जीवनात निराश न होणे ही देखील मोठी उपलब्धी आहे.  कामात मन न लागणे याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या कामाचा सन्मान न करणे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण करत असलेल्या कामाला सन्मान हा द्यायलाच हवा. तसा  प्रयत्न केला गेला पाहिजे.  कामाबद्दल आदर असेल तर ते काम लवकर करून घेण्याची भावनाही जागृत होते.

 

कामाबद्दल आदर असेल तर कामच पूजा होईल. कर्म हीच पूजा यावर विश्वास असेल तर आपली कामावरची श्रद्धा तर दृढ होईलच, पण आपले मनही कामात गुंतू लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्या हिताच्या असतात, तेव्हा आपण त्या कामाला ओझे न मानता ते आव्हान म्हणून स्वीकारायला हवे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.