आपण जगाबद्दल पुष्कळ ज्ञान एकत्रित करतो, पण आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्याला आपल्या स्वतःबद्दल मात्र काहीच माहिती नसते. सत्य हे आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत बाहेरील ज्ञान तुम्हाला शांतता आणि आराम देऊ शकत नाही.
झेन ऋषींनी जपानमध्ये एक मजेदार ध्यान पद्धत विकसित केली आहे. ही ध्यान पद्धत अशी आहे की, दोन लोक समोरासमोर बसतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहतात आणि आळीपाळीने विचारतात – ‘मला सांग, तुझ्या आतमध्ये कोण आहे?’ प्रत्येक व्यक्तीला पाच मिनिटे दिली जातात. त्या पाच मिनिटांत त्याला सतत स्वतःबद्दल बोलावं लागतं.
आपलं नाव, पत्ता, कुटुंब, शिक्षण, काम… त्यानंतर? एक क्षण असा येतो की सांगण्यासारखं काहीच उरत नाही. दिसायला बरं वाटतं परंतु प्रत्यक्षात करून बघितल्यास आपल्याबद्दल बोलणं किती कठीण आहे,याचा प्रत्यय येतो. पाच मिनिटांचा कालावधी किती दीर्घ आहे हेही आपल्याला प्रथमच समजते. या ध्यानाचा नियम असा आहे की समोर बसलेली व्यक्ती प्रतिक्रिया देत नाही. फक्त ऐकते. ती फक्त एक आरसा बनते,ज्यामध्ये तुम्ही तुमची प्रतिमा पाहता.
सुरुवातीला तर ही पद्धत खूप विचित्र वाटते, कारण आपण थेट कोणाच्या डोळ्यांत कधी पाहत नाही, आपण डोळ्यांत पाहायला टाळतो.
जर तुम्ही चिंताग्रस्त असाल, तुमचा घसा कोरडा झाला असेल तर ते सर्व समोरच्याला सांगा. त्यांना सांगितल्यानं मोठा दिलासा मिळतो. बर्याचदा आपण या भौतिक अवस्था लपवतो, परंतु संकोच दूर झाल्यानंतर, त्या क्षणी जे काही विचार उद्भवतात ते लोक बोलू लागतात. यात काहीही बोलण्याची सवलत आहे. मुळात तुम्ही अशा स्थितीकडे पोहचलेले असता की तुम्हाला तुमच्याबद्दल काहीच माहिती नसते, कारण आत फक्त शांतता, शून्यता असते. आत कोणी नसते.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली