जत,संकेत टाइम्स : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना १२ आणि २४ वर्षे वेतनश्रेणीचे लाभ प्रशिक्षण न झाल्यामुळे मिळत नाहीत. गेली अनेक वर्षे शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने हजारो शिक्षक वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे १२ आणि २४ वर्षे वेतनश्रेणीच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या सर्व शिक्षकांना वेतनश्रेणीचे लाभ सुरु करा या मागणीसाठी काल आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे दिगंबर सावंत यांनी सांगितलं आहे.
शिक्षण विभागाने दहा दिवसाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत २ हजार प्रशिक्षण शुल्क भरून राज्यभरातील लाखो शिक्षकांनी नोंदणी केली आहे. परंतु अद्यापी ऑनलाईन प्रशिक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. ऑनलाईन नोंदणी करणारा प्रत्येक शिक्षक प्रशिक्षण घेण्यास तयार आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षण सुरु होऊ शकलेले नाही, असंही पत्रात म्हटलं आहे.
शिक्षण विभागाची ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची संपूर्ण तयारी ज्यादिवशी पूर्ण होईल त्यादिवशी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. तसेच हे प्रशिक्षण घेण्यास सर्व शिक्षकही तयार आहेत. परंतु तुमचं ऑनलाईन प्रशिक्षण सुरु होत नाही म्हणून १२ आणि २४ वर्षे वेतनश्रेणीपासून शिक्षकांनी किती काळ वंचित राहायचं? हा खरा सवाल आहे. याबाबत तातडीने निर्णय होण्यासाठी आमदार कपिल पाटील शिक्षण मंत्र्यांकडेही पाठपुरावा करत आहेत, असं दिगंबर सावंत यांनी सांगितलं आहे.