खोजानवाडीत टेम्पो डोक्यावरून गेल्याने एकजण ठार
जत,संकेत टाइम्स : खोजानवाडी(ता.जत) येथे खते उतरणारा टेम्पो मागे घेत असताना टेम्पोच्या चाकाखाली सापडून लोहगाव (ता.जत) येथील वाहन चालक अजय बाबासाहेब सुर्वे (वय २५) हा तरुण दुर्देवाने ठार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,मृत अजय सुर्वे हा आवंढी (ता.जत) येथील सुरेश विश्वंभर कोडग यांच्याकडे मालवाहतूक टेम्पो चालक म्हणून काम करत होता. शुक्रवारी सकाळी खोजानवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये तो खत उतरविण्यासाठी गेला होता.

टेम्पोतील खत उतरविण्यासाठी तो गाडीच्या मागून टेम्पो मागे घेण्यासाठी दिशा सांगत होता. अचानक सर्वे यांचा पाय शेतातील ढेकळांमध्ये अडकून ते खाली पडले.मात्र हे चालकाच्या लक्षात आले नाही.तसाच टेम्पो मागे आल्याने टेम्पोचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.