उन्हाने कायली | रस्ते पडू लागले ओस : थंडवा देणाऱ्या फळांना मागणी वाढली
जत,संकेत टाइम्स : शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, सोमवारी (दि.16) कमाल तपमान अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिक उकाड्याने हैरान झाले असून, दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवरील वाहनांसह नागरिकांची वर्दळही विरळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्ण वातावरणामुळे नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे.
जतचे तापमान नेहमीच कमी नोंदवले जात असल्याने सामान्यत: तपमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे तपमान सरकले तरी जतकरांना उन्हाचा त्रास जाणवू लागतो. त्यात यावर्षी मार्च महिन्यातच तपमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने शहरवासीयांसमोर उष्णतेचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरात शीतपेयांसह, थंड फळांनाही मागणी वाढली आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक काळजी घेताना दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी छत्री व पांढऱ्या कपड्यांचा वापर करण्यात येत आहे.
अनेकजण दुपारच्या वेळी अति महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळत असल्याने रस्त्यांवरील वाहनांची वर्दळही विरळ झाल्याचे दिसत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्येही दुपारच्या वेळी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. घरातून बाहेर पडताना तोंडाला कपडा बांधून व अंगभर कपडे घालून बाहर पडण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी वाढली
शहरातील तपमानात वाढ झाल्याने विविध भागातील शीतपेयांची दुकाने, रसाची गुऱ्हाळे व फळांचे ज्युस सेंटरमध्ये नागरिकांची गर्दी वाढली असून, एप्रिल महिन्याच्या मध्यातच शहरातील तपमान 39 अंशांपर्यंत पोहोचल्याने जतकरांसमोर एप्रिलचा उत्तरार्ध व संपूर्ण मे महिना कसा जाणारा याविषयी चिंता निर्माण झाली आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, नैसर्गिक शीतपेयांसह थंड गुणधर्म असलेल्या फळांना मागणी वाढली आहे.