सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग | जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली बैठक

0
मुंबई : सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत व्यवहार्यता तपासणी करावी. यासाठी महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करावी अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिल्या.
 सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, सांगलीतील उद्योग संघटनेचे पदाधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीमुळे जिल्ह्यातील ड्रायपोर्ट उभारण्यासाठी हालचालींना वेग मिळाला आहे.
सांगली जिल्ह्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रंगा नाईक यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या रांजणी येथे शेळी मेंढी विकास महामंडळाची २२५० एकर जमीन आहे. यापैकी २५० एकर जमीन ही औद्योगिक विकास महामंडळास हस्तांतर केली जावी. यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांनी जमीन रेल्वे मार्गानजिक असायला हवी, असे सांगितले. ड्रायपोर्टबरोबरच मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क विकसित करायला हवा असंही ते म्हणाले.
रांजणी बरोबरच रेल्वे मार्गानजिकच्या इतरही काही ठिकाणी इनलैंड कंटेनर पोर्ट विकसित करता येईल का याची पाहणी करावी. यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणांना एकत्रित भेटी देऊन व्यवहार्यता तपासणी करावी, अशा सूचना श्री पाटील यांनी दिल्या.
Rate Card
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी एमआयडीसीने सर्व शक्यता तपासून पाहाव्यात. यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जिल्ह्यामध्ये मल्टीमॉडेल लॉजिस्टीक पार्क मंजूर करावा यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश दिले.
 उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगली जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी उपाय योजना कराव्यात, असे सांगितले.
यावेळी उद्योग विभागाचे सहसचिव संजय दिघावकर,  एमआयडीसीच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रयोग मुकादम आदी उपस्थित होते.
 दरम्यान मागच्या आठवड्यात सांगली जिल्ह्यात एअरपोर्ट नसल्याने जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्यात यावा अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.