जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील बाबरवस्ती (पांडोझरी) येथील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमांतर्गत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जून मध्ये दाखल होणाऱ्या दाखलपात्र बालकांना शाळेत दाखल करून घेण्यात आले. सांगली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थे ( डाएट) चे प्राचार्य डॉ.रमेश होसकोटी यांच्या उपस्थितीत बालकांना गुलाबपुष्प आणि पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हसकोटी म्हणाले की, बाबरवस्ती शाळेने ग्रामीण दुर्गम भागात समाजाच्या सहकार्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठे काम केले आहे. अन्य शाळांनी यातून प्रेरणा घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांनी स्वक्षमता विकासाबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता, शाळा विकास वाढीसाठी स्वयंस्फूर्तीने काम करणे गरजेचे आहे. शाळा पूर्व तयारी अंतर्गत पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील स्थानिक पदाधिकारी यांच्या सहकार्याने अंगणवाडी व इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे पूर्व नियोजन केल्यास निश्चितच उत्साहपूर्ण वातावरणात तयार होण्यास मदत होईल.
बाबरवस्ती शाळेत अनेक शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि उपक्रम राबविण्यात आले आहेत. क्रीडा साहित्य आणि पुस्तकांनी सुसज्ज करण्यात आला. शाळा परिसर झाडे- वेलीने हिरवागार करण्यात आला आहे. यामुळे मुले सुट्टीच्या काळातही शाळेत रमतात. आयएसओ मानांकित असलेली ही शाळा वर्षभर सुरू असते.
शाळेमध्ये लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या वाचन बांधकाम कट्टा व युथ फॉर जत यांनी दिलेल्या संगणकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आण्णाराया सिध्दगोंडा पाटील यांनी 5 विद्यार्थी दत्तक घेतले.याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांनी मानले. अधिव्याख्याता अरुण पाटील,डॉ .राजेंद्र भोई, तुकाराम कुंभार, केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड, राजकुमार करडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ज्योती कोरे, गीता बाबर,शोभा बाबर, सुरेश मोटे,आप्पासो गडदे, तुकाराम बाबर,प्रकाश बाबर, खांडेकर काकू, पुंडलिक कोरे,शाळेतील शिक्षक अनिल पवार, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.