आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा
तपमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावतीचे तापमान 38 ते 40 च्या घरात आहे. या तापमानवाढीचा प्रामुख्याने लहान मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. उन्हाळ्यात उघड्यावर पदार्थ खाणे प्रकृतीसाठी हितकारक नसते. तसेच बर्फ घातलेली पेये प्यायल्यामुळेही पोटदुखीचा त्रास होतो. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने तसेच शीतपेय प्यायल्यामुळे पोटामध्ये मळमळणे, जुलाब तसेच सतत उलटीचा त्रास होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. रुग्णालयांमध्ये हा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी ऋतू बदल होताना आहाराच्या सवयींमध्येही बदल करणे गरजेचे असते. मात्र हा बदल केला जात नाही. तेलकट व मसालेदार पदार्थ खाण्याच्या सवयी बदलल्या जात नाही. उष्माचा मारा चुकवण्यासाठी थंड पदार्थ खाल्ले जातात.
