जत, संकेत टाइम्स : जत तालुक्यासाठी म्हैशाळ उपसा सिंचन योजना ही एक प्रकारे वरदायनीच ठरली आहे. या योजनेमुळे येथील हजारो हेकटर जमीन ओलिताखाली आली आहे. या योजनेचे फलित आज बागायती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुष्काळी भाग आता सुजलाम, सुफलाम म्हणून ओळखला जातोय.
मात्र शेतीपंपासाठी वीजपुरवठा पुरेशा प्रमाणात, योग्य दाबाने, अखंडित होत नसल्याने तसेच वेळी-अवेळी वीज ये-जा करीत असल्याने शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे शेतीपंप ट्रान्सफॉर्मर वारंवार नादुरुस्त होत आहेत. परिणामी द्राक्ष, डाळिंब आणि इतर बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
त्यामुळे जत तालुक्यातील बिरनाळ, साळमळगेवाडी व असंगी येथे नवीन उपकेंद्र मंजूर होणेसाठी आणि शेगाव ,तिकोंडी व सोन्याळ येथे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविणे याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांची आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट घेऊन त्यांना जत तालुक्यातील विविध वीज प्रश्नाचे निवेदन दिले. त्यांनी यावर अंमल करून लवकरच योग्य त्या उपाययोजना करू अशी ग्वाही दिली.