जत, संकेत टाइम्स : जत तालुक्यातील बिळूर, बसर्गी, सिंदूर व आसपासच्या गावामध्ये गेल्या २ दिवसामध्ये अवकाळी व वादळी पाऊस झाला. रात्रंदिवस रक्ताचे पाणी करुन शेतात पिक उभे केलेले असतांना काही क्षणातच डोळ्यासमोर ते पिक जमीनदोस्त झाल्याने आता मोठे संकट उभे राहीले आहे. येथील शेतकरी बंधूंकडून माहिती घेत असताना त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पहावत नव्हते. पोटच्या मुलाप्रमाणे आपल्या बागेची तसेच शेतीची काळजी घेऊन हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला ही खरंच दुःखदायक बाब आहे.
कोरोनानंतर आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असताना बळीराजावर झालेला हा आघात खूप मोठा आहे. सध्या सगळीकडे द्राक्ष तोडणीचे काम सुरु होते. पण निसर्गापुढे कधीच कोणाचे चालले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित मिळणे आवश्यक आहे,अशी मागणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी कृषी मंत्री दादा भूसे यांच्याकडे केली आहे.
या अनुषंगाने जत तालुक्यामध्ये अवकाळी व वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांना दिले. त्यांनी ही तत्परतेने कृषी विभागाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.