बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याचे अधिकार आता उपविभागीय अधिकाऱ्यांना
सांगली : बैलगाड्यांच्या शर्यतीस परवानगी देण्यासाठी प्रदान करण्यात आलेले सर्व अधिकार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 7 चे पोटकलम 3 व कलम 9 अ व 330 अ च्या तरतुदीनुसार सांगली जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रासाठी प्रदान केले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी बैलगाडी शर्यतीस परवानगी देत असताना शासन आदेश व अधिसूचना अन्वये कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. तसेच भविष्यातही मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी देण्यासाठी असलेल्या तरतुदीमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी देण्यात यावी असे नमुद आहे. परंतु परिपूर्ण प्रस्तावासाठी अर्जदारास विहीत मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्रुटीची पूर्तता करणे जिकीरीचे होत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच भविष्यात बैलगाडी शर्यतीसाठी येणाऱ्या मोठ्या प्रमाणात अर्जांची संख्या व त्रुटी पुर्ततेकरीता नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी त्यांना प्राप्त असलेले अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान केले आहेत.
