गंभीर होत चाललेले संकट

0
रशिया आणि युक्रेनमध्ये पंचावन्न दिवसांपासून युद्ध सुरू आहे.  पण अजून तरी शांततेची शक्यता दूर दूरपर्यंत दिसत नाही.  उलट रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.   रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यापूर्वीच अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली आहे. तर अलीकडेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही ही भीती व्यक्त केली आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जगाला रशियाच्या आण्विक हल्ल्यावरून सतर्क केले आहे. जगाने रशियाकडून होणाऱ्या अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराच्या दिशेने तयार राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.  रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्याचा निर्णय घेईपर्यंत जगाने प्रतीक्षा करू नये. या आण्विक हल्ल्याकरता पूर्वीपासूनच तयारी करावी लागणार आहे. अँटी रेडिएशन मेडिसिन आणि हवाई हल्ल्यांपासून वाचण्यासाठी निवारा केंद्रांची आवश्यकता भासणार असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. जगाने पुतीन यांच्याकडून असलेल्या धोक्याबद्दल चिंता करणे  गरजेचे असल्याचा इशारा झेलेन्स्की यांनी यापूर्वीच दिला होता. तर रशियाने 24 फेब्रुवारी रोजी हल्ला सुरू केल्यावर त्वरित स्वतःच्या आण्विक दलांना हायअलर्टवर ठेवले होते. पुतीन यांनी सैन्याला न्यूक्लियर वॉर ड्रिल करण्याचा आदेशही दिला होता. रशियाच्या अस्तित्वास धोका निर्माण झाल्यास आम्ही युक्रेनवर अण्वस्त्राने हल्ला करू असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सांगितले होते. युक्रेन युद्धात पदरी पडलेली निराशा पाहून रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन हे कमी पल्ल्याचे आणि कमी तीव्रतेच्या अण्वस्त्रांची मदत घेऊ शकतात, असे सीआयएचे संचालक विलियम बर्न्स यांचे म्हणणे आहे. तर युक्रेन विरोधी युद्धात अपेक्षित यश न मिळाल्याने रशियाच्या महासत्तेच्या प्रतिमेला धक्का पोहचला आहे. अशा स्थितीत ही प्रतिमा कायम राखण्यासाठी रशिया युक्रेनविरोधात अण्वस्त्रे वापरू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिवाय युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या देशांनाही रशियाने धमकी दिली आहे. त्यामुळे  सध्यातरी युक्रेनच्या डोक्यावर  अण्वस्त्र हल्ल्याची टांगती तलवार आहे.
युक्रेनचे ओरेहोव शहर रशियाकडून लक्ष्य केले जात आहे. केवळ 10 किलोमीटरवरून  बॉम्बवर्षाव होतोय.
रशिया युक्रेन युद्धाला 55 दिवस झाले आहेत, रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनचे लोक कमालीचे दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. युक्रेनच्या मारियुपोलपासून खारकीव्ह शहरात रशियाच्या हल्ल्यामुळे मोठे’नुकसान झाले आहे. जिपोरिशियापासून 45  किलोमीटर अंतरावर ओरहोव शहर आहे. येथून केवळ 10 किलोमीटर अंतरावर
रशियाच्या सैन्याने तळ ठोकला आहे. शहराच्या वेशीवर येत रशियाचे सैन्य तोफगोळे डागत आहे. रशियाच्या सैन्याकडून दररोज हवाई हल्ले केले जात असून शहरातील घर, शाळा, रुग्णालयांना लक्ष्य केले जात असल्याचे स्थानिकांचे सांगणे आहे. या हल्ल्यांमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड ठरले आहे. पूर्ण शहरात भयाण शांतता पसरली असून दूरदूरपर्यंत एकही माणूस दिसून येत नाही. ओरहोवच्या शाळेतही  गोळीबाराची घटना घडली आहे. शहरात दररोज 1 हजार शेलिंग (स्फोट) होत असल्याचे सांगितले जात आहे.
रशिया सध्या युद्धोन्मादमध्ये आहे.युक्रेनियन शहरे आणि नागरिकांना ज्या शक्तीने तो पायदळी तुडवत आहे ते पाहता कोणताही अंदाज बांधणे कठीण आहे.  त्याने क्षेपणास्त्रे डागून युक्रेनमधील प्रमुख शहरे उद्ध्वस्त केली आहेत.मात्र त्यानंतरही तो युक्रेनच्या सैनिकांचे मनोधैर्य तोडू शकला नाही.  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ज्या प्रकारे रशियाला खुले आव्हान देत आहेत, ही काही छोटी बाब नाही.  यामुळे रशिया त्रस्त आहे.  त्यामुळेच युक्रेनलाच नव्हे, तर त्याच्या आडून अमेरिका आणि पाश्चात्य देशांनाही धडा शिकवण्याकडे रशिया झुकत आहे.
ताज्या बातमीनुसार रशियन सैन्याने युक्रेनमधील मारियुपोल शहर ताब्यात घेतले आहे.  या अडीच महिन्यांत रशियन सैन्याने युक्रेनमधील केवळ लष्करी तळ आणि शस्त्रास्त्रांचे कारखानेच नष्ट केले नाहीत तर नागरी तळ, रुग्णालये आणि सुरक्षित आश्रयस्थानांना देखील सोडलेले नाही. जवळपास 40 लाख  युक्रेनियन नागरिकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.  हजारो मारले गेले आहेत.  त्यामुळे बेघरांच्या संख्येचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. युक्रेनच्या विध्वंसामुळे निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.  मारियुपोल शहर रशियन सैन्याने ओलिस ठेवले आहे. तिथे आजारी माणसांसाठी ना खाण्यापिण्याचे सामान मिळत आहे, ना औषधे.  खार्किव, ल्विव्ह सारख्या शहरांवर हल्ले अव्याहतपणे सुरूच आहेत.
 बुचा आणि कीवमधील सामूहिक नरसंहाराची चर्चा यापूर्वीच समोर आली आहे.  रशियाचा कहर अजूनही थांबणार नसल्याचे ही सर्व परिस्थिती सांगत आहे.  पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रशियाला युक्रेनची ताकद मोजता आली नसावी.  तो इतके दिवस रणांगणावर राहील याची त्याला कल्पनाही नव्हती.  युक्रेननेही रशियन सैन्याचे सर्व प्रकारे मोठे नुकसान करून हा संदेश दिला आहे की, प्रदीर्घ युद्ध झाले तरी आपण शस्त्रे खाली ठेवणार नाही.अशा परिस्थितीत युद्ध कसे थांबवायचे, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेच्या फेऱ्या झाल्या, पण त्या सर्व निष्फळ ठरल्या.  मध्यस्थीचा प्रयत्न केल्याचा दावा करणार्‍या देशांचाही कोणताही परिणाम दिसला नाही.  सर्व देश आपापल्या सोयीनुसार मुत्सद्देगिरीचा प्रयत्न करत आहेत.  पण तरीही युद्ध थांबलेले नाही.  युक्रेन असहाय्य आहे. पण त्याने राशियापुढे गुडघे टेकलेले नाहीत. आश्‍चर्य म्हणजे संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थेचेही कोणी ऐकत नाही.  इतिहासात झालेल्या सर्व युद्धांतून आपण कोणताही धडा घेतलेला नाही असे दिसते.  समस्या अशी आहे की ज्या मोठ्या देशांकडून जगाला शांततेच्या प्रयत्नांची अपेक्षा आहे ते या युद्धाकडे संधी म्हणून पाहत आहेत. खरे तर हे युद्धापेक्षाही मोठे भयंकर संकट आहे.
– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.