विज बिलाचा ‘चेक बाऊंस’ ला एवढा लागणार दंड

0

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे ९५० ते एक हजार धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५/- रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे बिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध असली तरी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही सुमारे १ लाख ९ हजार वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. मात्र त्यापैकी दरमहा सुमारे ९०० ते एक हजार ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश अनादरित होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पुणे जिल्हा- ७०० ते ८००, सोलापूर- ४० ते ५०, सातारा- ३० ते ४०, सांगली- ३० ते ४० आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये ११० ते १२० धनादेश अनादरीत होत आहेत. या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५/- रुपये असे एकूण ८८५/- रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक ग्राहक क्रमांकाच्या वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक ग्राहक क्रमांकाच्या वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येते. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधीत रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते.

Rate Card

महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. तर क्रेडीटकार्ड वगळता सर्व ‘ऑनलाईन’द्वारे होणारा भरणा निशुल्क आहे. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

——————-

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.