सांगली जि. प. तील शिक्षणाधिकार्यासह अधीक्षक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | 1 लाख 70 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले : दोन दिवसांची पोलीस कोठडी

0
सांगली : तीन शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणीस मान्यता मिळवून देण्यासाठी सुमारे 1 लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
       याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांचे पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कांबळे यांच्याकडे सादर केला होता. हे काम करून देण्यासाठी कांबळे व अधीक्षक विजयकुमार सोनवणे यांनी प्रत्येकी 60 हजार रुपये प्रमाणे तिघांना 1 लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 26 एप्रिल 2022 रोजी अर्ज करून तक्रार केली होती.
         या तक्रारीनुसार 26 एप्रिल 2 मे व 6 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये शिक्षणाधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांच्या दोन शिक्षक मित्रांना प्रत्येकी 60 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे व चर्चेअंती एक लाख 70 हजार रुपयांचा सौदा ठरल्याचे निष्पन्न झाले.
Rate Card
       त्यानंतर कांबळे व सोनवणे यांच्याविरोधात राहत्या घराजवळ सापळा लावण्यात आला. तसेच तक्रारदारांना 1 लाख 70 हजार रुपये घेऊन सोनवणे यांच्या घरी पाठवण्यात आले. यावेळी सोनवणे यांनी ही रक्कम स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम त्यांनी कांबळे यांना दिली. याप्रकरणी दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात खळबळ उडाली होती. शिक्षणासारख्या पवित्र विभागात अशी लाचखोरी उजेडात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
        दरम्यान दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
       ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, सलीम मकानदार, सीमा माने, संजय सपकाळ, संजय कलकुटगी, रवींद्र धुमाळ, राधिका माने, भास्कर भोरे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.